नाशिक | प्रतिनिधी | Nashik
१६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी (Shalarth ID Scam) नाशिक शहर गुन्हे शाखेने आवळलेल्या फासात शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे (जि. जळगाव) धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेला संस्थेचा सहसचिव दीपक गरुड याला नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Nashik Road Court) साेमवारी(दि.३) न्यायालयीन कोठडी सुनावली असून गरुडच्या चौकशीतून घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संस्थेचे इतरही पदाधिकारी आणि कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
संशयित दीपक गरुडच्या पोलिस कोठडीदरम्यान नाशिक गुन्हे शाखेच्या (Nashik Crime Branch) एसआयटीने या घोटाळ्यातील अनेक बाबी समोर आणल्या आहेत. शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून त्याद्वारे आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या गैरव्यवहारात गरुड बंधूच नव्हे, तर संस्थेतील इतरही काही प्रमुख पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या घोटाळ्यात सहभागी असलेल्या शेंदुर्णी संस्थेच्या इतर शिलेदारांवरही अटकेची टांगती तलवार असणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : औषध कंपन्यांना पावणेदोन कोटींचा गंडा; अशोक स्तंभावर उघडले बनावट ऑफिस
गुन्हे शाखेच्या एसआयटीवे २७ जुलैच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) नातेपुते येथून शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा भाजप पदाधिकारी संजय गरुड (६७) यांना सापळा रचून बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर २९ जुलैच्या रात्री त्यांचा चुलत भाऊ आणि संस्थेचा सहसचिव दीपक गरुड (६५) याला बिजासणी घाटातून ताब्यात घेण्यात आले हाेते. शनिवारी (दि. १) न्यायालयाने संजय गरुड यास न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी प्रकृतीचे कारण पुढे करत तो अजूनही नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. तर दुसरीकडे, सहसचिव दीपक गरुडची थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) रवानगी करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे आणि त्यांच्या पथक तपास करत आहे.
खानदेशातील संस्थांचे धाबे दणाणले
राजकीय वजन आणि शैक्षणिक क्षेत्रातील वर्चस्वाच्या जोरावर सुरू असलेला हा १६० कोटींचा घोटाळा नाशिक पोलिसांनी उघडकीस आणल्यामुळे संपूर्ण खानदेशात एकच खळबळ उडाली आहे. बोगस शालार्थ आयडीच्या जोरावर शासकीय तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या इतरही शिक्षण संस्थाचालकांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : अखेर चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला




