नाशिक | प्रतिनिधी
गोदावरीच्या शांत प्रवाहाकाठी वसलेले चांदशी शिवार… दाट झाडी, निर्मनुष्य रस्ता आणि एका ४-५ दिवस जुन्या कुजलेल्या मृतदेह. कोणतीही ओळख नाही, घटनास्थळी सीसीटीव्ही नाही की कसला प्रत्यक्षदर्शी ! कागदावर फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद. पण, याच गुन्ह्यात नाशिक तालुका पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने मोबाईलमधील एका फोटोग्राफवरून असा काही सुगावा शोधला, की अवघ्या २४ तासांत हत्या करणारा खुद्द मृत महिलेचा पतीच निघाला!
४ मार्च २०२५ रोजी चांदशी शिवारातील गोदावरी पात्राजवळ एका गुराख्याने झाडाझुडपात मृतदेह पाहिल्याची माहिती दिली. सुरुवातीला शोध न लागल्याने पोलीस परतले, मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी तातडीने दोन-तीन पथके पुन्हा रवाना केली. सायंकाळच्या अंधारात फुगलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत एका ३५ ते ४० वयाच्या महिलेचा मृतदेह हाती आला. डॉक्टरांनी जागेवर शवविच्छेदन नाकारल्याने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी थेट शवविच्छेदन कक्ष गाठले.
गळ्याभोवती ओढणी गुंडाळलेली होती. डॉक्टरांनी गळा आवळून हत्या झाल्याचे सांगताच प्रकरणाला कलाटणी मिळाली आणि आकस्मिक मृत्यूच्या नोंदीचे रुपांतर हत्येच्या गुन्ह्यात झाले. मृतदेहाचे फोटो सर्वत्र व्हायरल करण्यात आले. पंचवटी पोलीस ठाण्यातून एका बेपत्ता विवाहितेची माहिती समोर आली. तिने घातलेल्या कपड्यांचे वर्णन जुळत होते. तिचा पती सुकीरॉय (नाव बदलेले) याला तातडीने बोलावण्यात आले. मात्र, सुकीने आपल्या पत्नीचे वय अवघे १९ वर्षे असल्याचे सांगताच पोलिसांचा संशय वाढला, कारण मृतदेह ३५-४० वर्षांच्या महिलेचा वाटत होता. आमले यांनी हार मानली नाही. त्यांनी पतीला पत्नीच्या अंगावरील काही विशिष्ट ओळखीच्या खुणा विचारल्या. डाव्या हाताच्या मनगटावर माझे नाव गोंदले आहे, अशी माहिती सुकीने दिली. मृतदेह कुजलेला असल्याने डॉक्टरांनी मनगटाची जागा स्वच्छ केली अन् सुकीचे नाव स्पष्ट दिसले. ती १९ वर्षांची विमल रॉयच होती.
संपादकीय : १६ सप्टेंबर २०२६ – विकासाच्या दाव्यांमागील बकाल वास्तव
पती सुकीने बनाव रचला होता की २८ फेब्रुवारी रोजी गोदाघाटावर ती अचानक हरवली. मात्र, पोलीस निरीक्षक आमले यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर तो गडबडला. संशय बळावल्याने आमले यांनी सुकीचा मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलमधील गॅलरी चाळताना एका फोटोवर आमले यांची नजर खिळली. तो फोटो सुयोजित गार्डन परिसरातील होता. त्या फोटोच्या बॅकग्राउंडला दिसणारी हिरवळ, झाडे आणि चांदशी शिवारातील घटनास्थळाची झाडी यामध्ये विलक्षण साम्य होते! हत्येच्या दिवशीच तो तिच्यासोबत याच परिसरात हजर होता, याचा हा जिवंत पुरावा होता. पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच सुकी पूर्णपणे खचला आणि त्याने आपल्याच पत्नीच्या हत्येची कबुली दिली. नेपाळच्या सीमेवरून पळून येऊन प्रेमविवाह केलेले हे दाम्पत्य सातपूरला राहत होते.

सुकीला विमलच्या माहेरच्यांकडून पैशांची लालसा होती, तसेच तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. २८ फेब्रुवारीला डोंगरे वसतिगृह मैदानातील प्रदर्शनात विमलने ड्रेसचा हट्ट धरला. पैसे नसल्याने वाद झाला. त्यानंतर तो तिला सुयोजित गार्डनला घेऊन आला. तिथेच त्याच्या डोक्यात हत्येचा प्लॅन शिजला. नैसर्गिक विधीचा बहाणा करून तो तिला समोरील निर्मनुष्य चांदशी रस्त्यावरील झाडीत घेऊन गेला आणि तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळला
भक्कम पुरावा अन् २४ तासांत तपास पूर्ण
गंगापूर रोडवरून सुयोजित गार्डनपर्यंत त्यांनी ज्या रिक्षाने प्रवास केला होता, ती रिक्षा स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली. पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून काढले आणि त्यानेही सुकीला ओळखले. कोणताही धागाधोरा नसताना केवळ एका फोटोग्राफमधील बॅकग्राउंडचा अँगल हेरून सत्यजित आमले आणि त्यांच्या पथकाने २४ तासांच्या आत या भीषण मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश केला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.




