दहिवड | वार्ताहर | Dahiwad
देवळा तालुक्यातील (Deola Taluka) दहिवड आणि चिंचवे गावाच्या सरहदीवर असलेल्या प्रसिद्ध ‘चोर चावडी’ धबधब्याच्या (Chor Chavdi Waterfall) डोहात बुडून एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. ऋषिकेश शशिकांत संसारे (वय २१, रा. वडगाव पंगु, ता. चांदवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल (मंगळवार, ७ जुलै) दुपारी घडलेल्या या घटनेनंतर, तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आज (बुधवार, ८ जुलै) दुपारी त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले.
पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आपल्या मित्रांसह चोर चावडी धबधब्यावर आला होता. धबधब्याखालील डोहात पाण्याचा आनंद घेत असताना, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल डोहात बुडाला. ऋषिकेश बुडत असल्याचे पाहताच त्याच्या मित्रांनी तातडीने पोलिसांना (Police) या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, एपीआय नंदा पाटील, पोलीस हवालदार नितीन बारहाते, राहुल शिरसाट, तसेच चांदवडचे पोलीस निरीक्षक वाक, चांदवडचे प्रांताधिकारी कडलक आणि देवळ्याचे तहसीलदार कुलकर्णी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हे देखील वाचा : Girish Mahajan : पिंपरी-चिंचवडच्या मोशीत मोठी दुर्घटना; मंत्री गिरीश महाजन नाशिकहून तातडीने रवाना
मंगळवारपासून शोधमोहीम सुरू; अखेर NDRF ला यश
मंगळवारी दुपारी ४ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत स्थानिक तरुण आणि मालेगाव (Malegaon) येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य राबवण्यात आले, मात्र अंधार पडल्याने शोध थांबवावा लागला. त्यानंतर आज (बुधवार) सकाळी ९ वाजेपासून ‘एनडीआरएफ’च्या (NDRF) जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. साधारण ७ ते ८ तासांच्या सततच्या प्रयत्नांनंतर, दुपारी ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास ऋषिकेशचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवला आहे.
चोर चावडी ठरतेय ‘डेथ ट्रॅप’; जुन्या आठवणी ताज्या
चोर चावडी धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वडनेर भैरव येथील तीन जण आणि मालेगाव येथील एका तरुणाचा येथे बुडून मृत्यू झाला आहे. कालच्या घटनेमुळे या भागातील धोकादायक परिस्थितीच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
तरुणांनी खबरदारी बाळगावी; प्रशासनाने आवाहन
सध्या पावसाळा सुरू असल्याने तरुण आणि हौशी पर्यटक धबधबे व नद्यांच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. मात्र, पाण्याचा अतिमोह आणि सेल्फी घेण्याच्या नादात अनेकदा खोलीचा अंदाज येत नाही आणि थेट जीवाला मुकावे लागते. पर्यटनासाठी जाताना तरुणांनी सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.




