नाशिक | Nashik
संकट कोणतेही असो, त्याकडे केवळ प्रशासकीय दृष्टीने न पाहता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मदतीसाठी पुढे सरसावणे, ही आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या कार्यशैलीची ओळख मानली जाते. गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील (Palghar District) अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा आढावा घेत असताना घडलेल्या दोन घटनांनी ही प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित केली.
त्र्यंबकेश्वर येथे पूरपरिस्थितीची पाहणी सुरू असताना पोलिसांचे (Police) वाहन चिखलात अडकले. परिस्थिती पाहून मंत्री महाजन यांनी कोणताही औपचारिकपणा न दाखवता स्वतः वाहनाचे स्टेअरिंग हाती घेतले आणि उपस्थितांच्या मदतीने वाहन चिखलातून बाहेर काढले. राज्याचा मंत्री असूनही पदाचा मोठेपणा बाजूला ठेवून प्रत्यक्ष कृतीत उतरलेली त्यांची ही भूमिका उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या लक्षात राहिली.
हे देखील वाचा : Girish Mahajan : पिंपरी-चिंचवडच्या मोशीत मोठी दुर्घटना; मंत्री गिरीश महाजन नाशिकहून तातडीने रवाना
याच दिवशी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्याचा दौरा आटोपून मुंबईकडे परतत असताना मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मनोर गावाजवळील उड्डाणपुलावर मुसळधार पावसात झालेला अपघात (Accident) त्यांच्या निदर्शनास आला. नालासोपारा येथील पांचाळ कुटुंबाची स्विफ्ट डिझायर कार ट्रकला धडकून ट्रकच्या पुढील भागात अडकली होती. धडकेमुळे कार काही अंतर फरफटत गेली होती. पावसामुळे वाहतूक खोळंबली होती आणि घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंत्री महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबविला आणि स्वतः घटनास्थळी उतरून परिस्थितीची पाहणी केली. कारमध्ये तीन महिला, एक लहान मुल आणि एक पुरुष असे पांचाळ कुटुंबातील सदस्य होते. त्यांनी तत्काळ पोलिसांना आवश्यक सूचना देत उपस्थित पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने ट्रकमध्ये अडकलेली कार सुरक्षितपणे बाजूला करण्याची व्यवस्था केली. त्यानंतर पांचाळ कुटुंबाला सुरक्षितपणे जवळच्या पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यांच्यासोबत एका पोलीस कर्मचार्याची नियुक्ती करून कुटुंबाला आवश्यक मदत व धीर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंद पडलेला ट्रक तातडीने बाजूला करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
हे देखील वाचा : Nashik News : मंत्री गिरीश महाजनांनी केली रामकुंड परिसराची पाहणी
या संपूर्ण घटनेदरम्यान आपल्या मदतीला (Help) स्वतः राज्याचे मंत्री मुसळधार पावसात रस्त्यावर उतरले आहेत, याची जाणीव होताच पांचाळ कुटुंबानेही आश्चर्य व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.गेल्या काही वर्षांत राज्यात पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यानंतर गिरीश महाजन हे प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेताना आणि मदतकार्याला गती देताना अनेकदा दिसले आहेत. प्रशासनाला दिशा देतानाच गरज भासल्यास स्वतः पुढे होऊन परिस्थिती हाताळण्याची त्यांची कार्यपद्धती अनेक प्रसंगांत दिसून आली आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) चिखलात अडकलेले पोलिसांचे वाहन स्वतः स्टेअरिंग हाती घेऊन बाहेर काढणे आणि त्याच दिवशी रात्री महामार्गावर अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी मुसळधार पावसात रस्त्यावर उतरून मदतकार्याचे नेतृत्व करणे, या दोन घटना जरी स्वरूपाने वेगळ्या असल्या तरी त्या त्यांच्या कार्यशैलीचे समान सूत्र अधोरेखित करतात, संकटाच्या वेळी केवळ आदेश देणे नव्हे, तर स्वतः पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणे. कदाचित या घटना प्रशासकीय नोंदींमध्ये मोठ्या म्हणून नोंदवल्या जाणार नाहीत; मात्र संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांसाठी वेळेवर मिळालेला आधार हा नेहमीच मोठा असतो. म्हणूनच राज्यभरात अनेकांच्या मनात गिरीश महाजन यांची ओळख “संकटमोचक” अशी निर्माण झाली असून, या दोन घटनांनी त्या प्रतिमेला पुन्हा एकदा उजाळा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.




