नाशिक | Nashik
गेल्या १५ दिवसांपासून शहरातील ईदगाह मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन (Protest) सुरू आहे. दहा ते बारा दिवसांपासून तीन विद्यार्थी (Student) आमरण उपोषणाला बसले असून, मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) रोजी हजारो विद्यार्थ्यांनी नाशिकच्या (Nashik) आदिवासी विकास भवनावर धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाने विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारत सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. अद्याप आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आता थेट आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, राजीनामा मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आज (बुधवारी) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असून, ते गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांच्या निवासी प्रशिक्षण शिबिरात समारोपावेळी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता राहुल गांधी १० ते १२ आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळा सोबत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार आहेत. या आंदोलक विद्यार्थ्यांना आज सकाळी राहुल गांधी यांच्या कार्यालयातून भेटीसाठी फोन आला होता. यानंतर आता विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे.
हे देखील वाचा : Nashik News : राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान भाजप आक्रमक; काळ्या फिती लावून जोरदार निदर्शने
दरम्यान, राहुल गांधी हे जेन झी (Gen-Zee) चे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी संसदेत आमच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सरकारने पुढील दोन दिवसांत मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण राज्यभरात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या आंदोलनाचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे.
आदित्य ठाकरेही देणार उपोषणस्थळी भेट
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या (गुरुवारी) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार आहेत. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत देखील चर्चा करणार आहेत. tyamule त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.




