नाशिक | भारत पगारे | Nashik
पारंपरिक गुन्हेगारीच्या पद्धती बदलत असताना, आता महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे तपास प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यानुसार, पाेलिसांच्या (Police) मदतीला आता ‘तपास सारथी’ (Tapas Sarathi) ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आता गुन्हा नोंदवण्यापासून ते न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर हा ‘तपास सारथी’ पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.
सर्वसामान्य भाषेत सांगायचे तर, ‘तपास सारथी’ हा महाराष्ट्र पोलिसांचा (Maharashtra Police) ‘डिजिटल कायदेतज्ज्ञ आणि सहाय्यक’ असेल. हा कोणत्याही परदेशी किंवा खाजगी कंपनीच्या क्लाउडवर चालणारा सामान्य एआय नसून, तो भारताचा स्वतःचा सॉव्हरेन एआय आहे. म्हणजे ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, ज्याचे नियंत्रण, डेटा आणि पायाभूत सुविधा देशाच्या व राज्याच्या स्वतःच्या ताब्यात असणार आहेत. पोलिसांकडील गुन्हेगारांची (Criminal) माहिती, एफआयआर आणि संवेदनशील कागदपत्रे अत्यंत गोपनीय असतात. हा डेटा लीक होऊ नये किंवा परदेशी सर्व्हरवर जाऊ नये, यासाठी संपूर्ण सुरक्षित आणि स्वदेशी डेटा सुरक्षा प्रणालीवर ‘तपास सारथी’ची निर्मिती करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : मुलाच्या संसारासाठी मोडली एफडी; दागिने घेऊन सून माहेरी
‘तपास सारथी’चे मुख्य फायदे
गुन्ह्यांच्या फाईल्स चाळण्यात आणि मसुदा तयार करण्यात पोलिसांचा जाणारा वेळ वाचणार असून तो प्रत्यक्ष तपासासाठी वापरता येईल. ‘सॉव्हरेन एआय’ मॉडेल असल्यामुळे पोलिसांचा अत्यंत संवेदनशील डेटा राज्याच्या सुरक्षित सर्व्हरमध्येच बंदिस्त राहील. कायदेशीर पळवाटा आधीच बंद केल्यामुळे न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल. डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक रिपोर्ट यांचे वर्गीकरण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. नवीन भरती झालेल्या पोलिसांना देखील या प्रणालीमुळे अनुभवी अधिकाऱ्यांप्रमाणे अचूक तपास करणे शक्य होणार आहे.
कसे करणार काम?
कागदपत्रांचे विश्लेषण : हजारो पानांचे पुरावे, बँक स्टेटमेंट्स किंवा कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (सीडीआर) काही सेकंदांत स्कॅन करून त्यातील मुख्य धागेदोरे तपास अधिकाऱ्यांसमोर मांडणार.
कायदेशीर संदर्भ शोधणे : एखाद्या गुन्ह्यात कोणते कलम योग्य बसेल, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे यापूर्वीचे काय निकाल आहेत, याचे संदर्भ पोलिसांना मिळतील.
प्रक्रियेतील अचूकता : तपासादरम्यान कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी हे साधन पोलिसांना प्रत्येक टप्प्यावर ‘चेकलिस्ट’ देऊन मार्गदर्शन करेल. यामुळे न्यायालयामध्ये खटला टिकण्यास मदत होईल.
एका क्लिकवर योग्य कायदेशीर कलमे आणि जुने निकाल समोर येतील.
त्रुटीरहित दोषारोपपत्र तयार करण्यासाठी डिजिटल मार्गदर्शन मिळेल.




