पंचवटी | प्रतिनिधी
प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि कामाचा प्रचंड ताण यामुळे सध्या सरकारी कर्मचारी, विशेषतः शिक्षक वर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. “निवडणूक आयोगाचे (BLO) काम करायचे की जनगणनेचे?” अशा कात्रीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांनी आता प्रशासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. “आम्ही माणसे आहोत, रोबोट नाही,”अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणना विभागाला लेखी पत्राद्वारे कळवले होते की, सध्या निवडणूक आयोगाचे ‘मॅपिंग’, ‘DSE’ आणि ‘ब्लर फोटो’ दुरुस्तीचे काम अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांना इतर कामात जुंपू नये,असे स्पष्ट निर्देश असतानाही, पंचवटीतील आर. पी. विद्यालयात ६ ते ८ मे दरम्यान जनगणनेचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत जनगणना विभागाने ३०० हून अधिक बीएलओंना प्रशिक्षणास बोलावल्याने प्रशासनातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.
या कामाचे वाटप करताना वयाचे कोणतेही निकष पाळले गेले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. ५० वर्षांवरील शिक्षकांनाही या अतिशय कष्टाच्या आणि फिरतीच्या कामात जुंपण्यात आले आहे. त्यातच,काम पूर्ण न झाल्यास दोन्ही विभागांकडून सातत्याने नोटीस देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Nashik TCS: धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा कट? निदा खानवर नव्या गुन्ह्याची नोंद
तसेच जनगणनेचे काम डिजिटल पद्धतीने करण्यासाठी मोबाईलमध्ये ‘अँड्रॉइड ११’ पेक्षा जास्त क्षमतेचे सॉफ्टवेअर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, सुमारे ७० टक्के कर्मचाऱ्यांकडे जुन्या व्हर्जनचे मोबाईल आहेत. “केवळ या कामासाठी नवीन महागडा मोबाईल विकत घ्यायचा का? त्यासाठी कर्ज काढायचे का?” असा संतप्त सवाल कर्मचारी विचारत आहेत. नवीन मोबाईल घेण्यासाठी विलंब झाल्यास पुन्हा प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर राहणार आहे.
या कामांतर्गत कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन माहिती गोळा करावी लागणार आहे. महिला शिक्षकांसाठी अनोळखी भागात एकट्याने फिरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. “आम्ही कोणतेही एक काम करायला तयार आहोत,” असे कर्मचारी सांगत आहेत. नियमित कार्यालयीन काम, निवडणूक विभागाचे काम आणि आता जनगणनेचे काम, अशी तिहेरी कसरत करणे अशक्य आहे. त्यामुळे जनगणनेचे काम करायचे असल्यास आम्हाला इतर सर्व कामांतून पूर्णवेळ कार्यमुक्त करावे, अशी आग्रही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आता या गोंधळावर वरिष्ठ प्रशासन काय तोडगा काढणार, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्मचाऱ्याना काम करतेवेळी येणाऱ्या अडचणी
धमक्यांचे सत्र: काम न झाल्यास नोटीस देण्याच्या प्रशासकीय धमक्यांमुळे कर्मचारी तणावात.
तांत्रिक अडचण: नवीन मोबाईल घेण्यासाठी आर्थिक तरतूद कुठून करावी?
दोन दोन ड्युट्या: निवडणूक आयोगाची डेडलाईन आणि जनगणनेचे प्रशिक्षण एकाच वेळी.




