नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात बुधवारी (दि.२२) रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चोवीस तासांत १३३ मि.मी.पावसाची नोंद झाली. वादळी वार्यासह झालेल्या संततधार पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले.
हे देखील वाचा : Surgana Rain News : सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार पाऊस; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
दुसरीकडे गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरण ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी गोदावरी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कश्यपी धरण ७१ टक्के, गौतमी गोदावरी धरण ९० टक्के भरल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला; दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी, तीन वाजेनंतर धोकादायक परिस्थितीची शक्यता
२४ जुलैला पावसाचा यलो अलर्ट
शुक्रवारी (दि. २४ जुलै) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहू शकतो. घाट परिसरात मात्र ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
२५ जुलैला घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर
शनिवारी (दि. २५ जुलै) घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर जोरदार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील मंदिरे पाण्याखाली
शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
कृषी हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टीचा इशारा असलेल्या भागात पिकांमधील पाण्याचा निचरा, शेतीमाल व कृषी अवजारे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, तसेच वीजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी, नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे, होर्डिंग्ज व विजेच्या तारा यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. हवामान विभाग आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.




