नाशिक | Nashik
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात उद्या (मंगळवारी) ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन एकाच दिवसात तब्बल ३०० मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यांनी आज (सोमवारी) मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यातील पावसाची आणि संभाव्य पूरपरिस्थितीची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्यानंतर नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Aayush Prasad) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, उद्या म्हणजेच (दि.७ जुलै) रोजी नाशिक शहर वगळून नाशिक तालुक्याचा ग्रामीण भाग, त्र्यंबकेश्वर तालुका, इगतपुरी तालुका या तीन तालुक्यातील आठवडी बाजार बंद राहतील. तसेच या भागातील सर्व शाळा, कॉलेजे देखील बंद असतील. उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाण्याचे टाळावे, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Rain Update : नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील ४८ तासांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता; शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचे संकेत
उद्याच्या दिवस प्रवास टाळावा
यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, उद्या अतिआवश्यक नसेल तर प्रवास टाळावा. कारण प्रशासन जे रस्ते बंद करणार आहे त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. या रस्त्यांची यादी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, राष्ट्रीय महामार्गाच्या मदतीने केली जाईल. हे रस्ते बंद झाल्यामुळे त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येईल. कारण नसताना बाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी देवीचे मंदिर राहणार बंद
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, ढगफुटी सदृश्य पावसाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर हे बुधवारपर्यंत बंद राहणार आहे. आज संध्याकाळचा सूर्यास्त झाल्यानंतर पूजा होईल, त्यानंतर परवा म्हणजेच बुधवारपर्यंत हे मंदिर बंद असेल. ज्या भाविकांना उद्या मंदिरात येऊन दर्शन घ्यायचे होते, त्यांनी त्र्यंबकेश्वरला येणे टाळावे. त्यामुळे नागरिकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्याच्या दिवस सप्तशृंगी देवीचे दर्शनही देखील बंद राहणार असून, ज्या-ज्या गावात पूर येण्याची शक्यता आहे, त्यांचीही यादी तयारी केली जाईल, असेही प्रसाद म्हणाले.
कुठल्या शाळा-कॉलेज असणार बंद
प्रशासनाने पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच धबधबे, गड-किल्ले आणि नदीकाठच्या पर्यटनस्थळी नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर नद्यांचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लहान पुलांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. भूस्खलनाची शक्यता असलेल्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलविणे, कमकुवत बांधकामांबाबत खबरदारी घेणे आणि आवश्यकतेनुसार स्थलांतराची तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यंत्रणा सज्ज
ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून रुग्णवाहिका, जेसीबी, पोकलेन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून इगतपुरी रेल्वे विभागालाही हवामानाबाबत सतर्क करण्यात आले आहे. पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) २४ तास कार्यरत ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०८ (रुग्णवाहिका) किंवा ११२ (आपत्कालीन सेवा) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरज भासल्यास लष्कराची मदत घेणार
तसेच समृद्धी महामार्गावर वाहनचालकांनी वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे, तर पुढील दोन-तीन दिवसांत प्रसूती अपेक्षित असलेल्या गर्भवती महिलांनी खबरदारीचा उपाय म्हणून आजच जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावे, असा सल्लाही प्रशासनाने दिला आहे. गरज भासल्यास लष्कराची मदत घेण्याची तयारी ठेवण्यात आली असून कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नाशिक शहरातील शाळा व इतर स्थानिक निर्णय महापालिका प्रशासन आणि महापौर यांच्या स्तरावर घेतले जाणार आहेत.
पर्यटकांसाठी पर्यटनस्थळे बंद
नाशिकमधील उद्याच्या ढगफुटीसदृश्य पावसाच्या पार्श्वभूमीवर वनविभागानेही (Forest Department) मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार दुगारवाडी धबधबा, हरिहर गड (Harihar Fort) आणि पहिने (Pahine) ही पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असतील असे आदेश वनपरीक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी काढले आहेत.




