Tuesday, July 7, 2026
HomeनाशिकNashik Cloudburst Update : नाशिककरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका - महापौर आडके

Nashik Cloudburst Update : नाशिककरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका – महापौर आडके

शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

नाशिक | Nashik

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या (Nashik Taluka) पश्चिम भागात मंगळवार (दि.०७ जुलै) रोजी ढगफुटी सदृश अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आपत्ती निवारणाचे सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांनीही दक्षता बाळगावी. आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले.

- Advertisement -

दरम्यान यानंतर नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री, महापौर हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Aher-Adke) उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक शहराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी शहरातील महापालिकेच्या (Nashik NMC School) सर्व शाळांसह खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे उद्या नाशिकमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत.

हे देखील वाचा : Nashik Rain Update : नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील ४८ तासांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता; शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचे संकेत

यावेळी महापौर हिमगौरी आडके म्हणाल्या की, आज (सोमवारी) रात्री १ ते उद्या (मंगळवारी) सकाळी १० वाजेपर्यंत दहा वर्षांतील एका दिवसात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहे. अग्निशमन दल, आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यात आला असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू असून, आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. झाडांखाली वाहने उभी करू नयेत, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पाणी पाहण्यासाठी बाहेर पडू नये आणि महापालिकेकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

आयुक्त खत्री काय म्हणाल्या?

त्र्यंबकेश्वर परिसरात मंगळवारी (७ जुलै) ढगफुटीसदृश अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिल्यानंतर नाशिक महापालिकेने संपूर्ण यंत्रणा हायअलर्टवर ठेवली आहे. २०० ते ३०० मिलिमीटर पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक विभाग आणि वॉर्डमध्ये यंत्रसामग्री, मनुष्यबळ तसेच आपत्कालीन पथके सज्ज करण्यात आली आहेत. नाले, ड्रेनेज, पूरप्रवण भाग, नदीकाठ आणि धोकादायक इमारतींवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, शक्य असल्यास खासगी कार्यालयांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करावा आणि अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केले.

प्रत्येक वॉर्डात यंत्रणा सज्ज

महापालिकेच्या प्रत्येक विभाग आणि वॉर्डमध्ये जेसीबी, पंप, जनरेटर, आपत्कालीन साहित्य आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे. नाले आणि ड्रेनेजची सातत्याने पाहणी केली जाणार असून, पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके चोवीस तास कार्यरत राहतील. नियंत्रण कक्षातून सर्व परिस्थितीवर सतत नजर ठेवली जाणार असून, कोणतीही तक्रार किंवा मदतीचा संदेश मिळताच तातडीने पथक रवाना करण्यात येणार आहे.

धोकादायक इमारतींवर विशेष लक्ष

महापालिकेने धोकादायक इमारती, नदीकाठची वस्ती आणि पूरप्रवण भागांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. काजीगढीसह संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात येत असून, गरज भासल्यास नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा इमारतींबाबत माहिती त्वरित महापालिकेला द्यावी, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित स्थळी जाण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी मनपाचे आवाहन

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा आणि शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करावा, असे महापालिकेने आवाहन केले आहे. झाडांखाली किंवा धोकादायक इमारतींजवळ वाहने उभी करू नयेत. नदी, नाले आणि पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महापालिकेच्या अधिकृत सूचना आणि हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवारी) मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यातील पावसाची आणि संभाव्य पूरपरिस्थितीची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधतांना अरबी समुद्रावर तयार होत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्याचा पश्चिम भागात उद्या ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सुमारे ३०० मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले होते.

हे देखील वाचा : Nashik Cloudburst Update : ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरासह ‘हे’ राहणार बंद; जिल्हाधिकारी काय म्हणाले?

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याच्या काही भागात ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतर्क झाले असून उपाययोजना सुरु केल्या आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या दिवशी नाशिक शहर महानगरपालिका कार्यक्षेत्र वगळता उर्वरित ग्रामीण भाग, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा या तालुक्यातील आठवडे बाजार, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. शेतकऱ्यांनीही शेतात जाणे टाळावे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल, तरच घराबाहेर पडावे. या परिसरातील आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेले काही रस्ते सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात येतील,असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar : साधूग्राम आणि घाट परिसराचे सुरक्षित व सक्षम नियोजन करावे...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील साधूग्राम आणि घाट परिसराचे नियोजन आतापासूनच सुनियोजित पद्धतीने करण्याचे निर्देश कुंभमेळा मंत्री गिरीश...