Sunday, August 9, 2026
HomeनाशिकNashik News: सकाळी बुजवला, दुपारी पुन्हा उखडला! बसस्थानकाबाहेरील खड्ड्यात रिक्षा अडकल्याने महापालिकेच्या...

Nashik News: सकाळी बुजवला, दुपारी पुन्हा उखडला! बसस्थानकाबाहेरील खड्ड्यात रिक्षा अडकल्याने महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरामध्ये सध्या सुरु असलेल्या रस्त्यांच्या विकासकामांमुळे नाशिककर हैराण झाले असून या खड्ड्यांमुळे नाशिककर अपघातांना बळी पडत आहे. शहरातील नाशिकरोड परिसरात देखील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकाजवळ असलेल्या पोलीस चौकीसमोरील रस्त्यावर रस्त्यांच्या कामामुळे भुयारासारखा मोठा खड्डा पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने हा खड्डा शुक्रवारी सकाळीच बुजविल्याचा दावा केला असतानाही काही तासांतच त्याच ठिकाणी एक रिक्षा अडकली.

पाइपलाइनच्या कामानंतर रस्त्यांची दुर्दशा
गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरातील प्रमुख रस्त्यांवर पाइपलाइन उभारणीची कामे सुरू होती. या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते कायमस्वरूपी दुरुस्त करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करून बुजविण्यात आल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी टाकलेली माती आणि वाळू वाहून गेली. परिणामी पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत.

- Advertisement -

Nashik Crime News: सोशल मीडिया रील्स आणि थ्रिलच्या नादात ‘जेन-झी’! नाशिकरोडला हवेत गोळीबार करणारी तरुणी गजाआड

दोनदा खोदलेल्या रस्त्यावरच पडला भुयारासारखा खड्डा
नाशिकरोड बसस्थानकासमोरील पोलीस चौकीसमोरील रस्ता पाइपलाइन आणि चेंबरच्या कामासाठी दोन वेळा खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता बुजविण्यात आला; मात्र योग्य पद्धतीने खड्डा न बुजवल्याने पावसामुळे माती वाहून गेली आणि त्याच ठिकाणी भुयारासारखा मोठा खड्डा निर्माण झाला.

या मार्गावरून दररोज बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि शहराच्या विविध भागांकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची तसेच सिटी लिंक बस, रिक्षा आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

खड्डा बुजवला… पण काही तासांतच रिक्षा अडकली
दरम्यान, नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी संबंधित खड्डा बुजविण्याचे काम केले. मात्र, काही वेळातच त्याच ठिकाणी एक रिक्षा अडकली. रिक्षा चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांना मोठ्या प्रयत्नांनी रिक्षा खड्ड्यातून बाहेर काढावी लागली. या घटनेमुळे महापालिकेच्या दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
नाशिकरोड परिसरात जवळपास प्रत्येक प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले असून नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता खोदलेले रस्ते अभियांत्रिकी निकषांनुसार कायमस्वरूपी दुरुस्त करावेत, तसेच संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : ‘राज’ की बात अन् भाजपची वाट!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा आणि त्याचवेळी भारतीय जनता पक्षामध्ये उत्तर महाराष्ट्रात उफाळून आलेला अंतर्गत...