त्र्यंबकेश्वर| Trimbakeshwar
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर शहरासह (Trimbakeshwar City and Taluka) तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील काही छोट्या पुलांवरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही भागांत दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दरम्यान या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे बघायला मिळत आहे.
त्र्यंबक-जव्हार-पालघर रस्त्यावरील गणपत बारी (Ganpat Bari) येथे आज (बुधवारी) रात्री आणि सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. येथील डोंगराचा काही भाग खचून अचानक रस्त्यावर आला. यामुळे रस्त्याचा अर्धा भाग पूर्णपणे बंद झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या सहाय्याने दरड आणि मातीचा ढिगारा हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम वेगाने सुरू केले. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून घटनास्थळी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते.
हे देखील वाचा : Trimbakeshwar Rain Update : त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटे मुसळधार; मुख्य रस्त्यांवरून वाहिले पाणी, शहरात चिखलाचे साम्राज्य
बेझे फाटा ते बेझे गाव रस्ता गेला वाहून
बेझे फाटा ते बेझे गाव या दरम्यान जाणारा रस्ता मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेल्याने रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पादचारी, दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. सध्या प्रशासनाने तातडीने याठिकाणी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे.
नील पर्वताच्या पायथ्याशी दरड कोसळली
त्र्यंबकेश्वर येथील नील पर्वताच्या पायथ्याशी जलसंपदा विभागाच्या वतीने ‘बेझे वॉटर ग्रीड’ (Beze Water Grid) प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या पाईपलाईनसाठी त्र्यंबकच्या दिशेने जाणारा एक छोटा रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे या खोदलेल्या रस्त्याच्या वरील बाजूस मोठी दरड (Landslide) कोसळली. त्यामुळे येथील एका वस्तीवरील साधारणतः १० ते १२ कुटुंबांचा त्र्यंबक शहराकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल, काम युद्धपातळीवर सुरु
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांत अधिकारी, स्थानिक तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रस्ता पूर्ववत करण्याचे आणि गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित सर्व यंत्रणा जागेवर पोहोचल्या असून रस्ता लवकरच वाहतुकीसाठी योग्य केला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
हे देखील वाचा : Nashik News : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु; पिंपळगाव बहुलाजवळ रस्ता खचल्याने झाली होती विस्कळीत
किकवी नदीचा पुल पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथील किकवी नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने साबरवाडी, ब्राम्हणवाडे, माळेगाव, दिव्याचा पाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. पूलावर पाणी असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
हिरडीच्या पुलावरही पाणी
तालुक्यातील हिरडी येथील पुलावर कंबरा इतके पाणी असल्याने वाहतूक खोळंबली आहे. तसेच भात शेतीत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणवर रोपे सडण्याची शक्यता आहे. तसेच रोहिले,गिरणारेकडे जाणारी वाहतूक देखील बंद झाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain Update : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता पिंपळगाव बहुल्याजवळ खचला; वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल
भाताच्या रोपाचे नुकसान
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात लागवडीसाठी आलेल्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यावर पुन्हा रोपे टाकण्याची नामुष्की ओढावली आहे. भात लागवडीसाठी जरी पाऊस चांगला असला तरी भाताच्या रोपांसाठी नुकसानीकारक आहे.




