नाशिक | Nashik
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर गिते यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता नाशिक विधानपरिषदेच्या रिंगणात महायुतीचे केवळ नरेंद्र दराडे (Narendra Darade) हेच एकमेव अधिकृत उमेदवार असणार आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना गोकुळ गिते म्हणाले की, मी आजपासून निवडणुकीचा प्रचार थांबवत आहे, असे सांगितले. तर माध्यम प्रतिनिधींनी तुमच्यावर दबाव आणला गेला का? किंवा चौकशीला घाबरले आहात का? असे विचारले असता ते म्हणाले, मी कोणत्याही चौकशीला घाबरलो नसून माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (NCP Sharad Pawar) विधानपरिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी सत्ताधारी पक्ष समोर होता. तरी ती निवडणूक मी अंगावर घेतली. तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. तेव्हा देखील घाबरलो नाही आणि आताही घाबरण्याचे कारण नाही” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, “मतदारांची महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारा विरोधात नाराजी असल्याने कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीपासून माध्यमांमध्ये महाजन व गिते निकटवर्तीय आहेत असा शब्द वापरला गेला तो खरा आहे. कारण मंत्री महाजन हे आमचे मार्गदर्शक असून, मी जरी भाजपचा सक्रीय कार्यकर्ता नसलो तरी माझे बंधू पक्षात आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर सदैव गिरीश महाजन यांचा कृपा आशीर्वाद राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला महाजन यांचे पाठबळ मिळत असल्याचा संशय होता. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर वरून दबाव होता”, असे गोकुळ गिते यांनी सांगितले.
तसेच “कौटुंबिक जबाबदारीचे भान कधीकधी ठेवले पाहिजे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि बंधू गणेश गिते यांच्यापेक्षा मला माझी आमदारकी मोठी वाटत नाही. ती भविष्यातही मला मिळू शकते. सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सर्वांचा मान ठेवत आणि कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते म्हणून मी प्रचार थांबवत आहे”, असेही गिते म्हणाले.
गोकुळ गितेंचे ‘त्या’ प्रश्नावर मात्र मौन
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी गोकुळ गिते यांना “निवडणुकीचा प्रचार थांबवला, पण नरेंद्र दराडे यांना अधिकृत पाठिंबा आहे का? असे विचारले असता ते कोणतेही उत्तर न देता पत्रकार परिषदेतून उठून गेले. तसेच मी घोडेबाजार केला नाही. मी माझा प्रचार थांबविला आहे, कार्यकर्त्यांना प्रचार थांबविण्यास सांगितले आहे. घरात दोन आमदारकी असून लोकांच्या मागण्या मान्य करा, प्रश्न सोडवा असा सल्लाही त्यांनी दराडे यांना दिला. दरम्यान यावरून महायुतीचा हा समेट केवळ नावापुरताच आहे का? अशी जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : मी निवडणुकीचा प्रचार थांबवतोय – गोकुळ गितेंची पत्रकार परिषदेत माहिती
गिरीश महाजन काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “नाशिकची जागा मिळवण्यासाठी अंतर्गत ओढाताण झाली होती, त्यामुळे याला राजकीय ड्रामा म्हणता येणार नाही. नाशिकची जागा शिवसेना (शिंदे गट) पक्षाला सुटली होती. भाजपचे गणेश गिते यांनीही या जागेची मागणी केली होती. मात्र, नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही जागा शिवसेनेकडे गेली. आता सर्व चर्चा आणि मतभेद मिटले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही गितेंना कोणतीही राजकीय कमिटमेंट (आश्वासन) दिलेली नाही आणि त्यांनीही तशी मागणी केली नाही. मात्र, भविष्यात पक्षाकडून त्यांचा नक्कीच योग्य विचार केला जाईल. गोकुळ गिते यांनी आता नरेंद्र दराडे यांना पूर्ण पाठिंबा दिला असून, दराडे यांना मोठ्या बहुमताने निवडून आणणे हेच आमचे ध्येय आहे”, असे त्यांनी म्हटले.
म्हाडा प्रकरणाच्या ‘त्या’ पत्राबाबतही बोलले
गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांच्याबाबत म्हाडा प्रकरणाच्या आलेल्या पत्रावर बोलतांना महाजन म्हणाले की, “गिते हे कोणत्याही नोटीसला घाबरणारे व्यक्ती नाहीत. म्हाडाचा विषय हा न्यायप्रविष्ट असून तो अत्यंत छोटा विषय आहे, त्याचा या माघारीशी काहीही संबंध नाही. आमचा आमच्या सर्व नगरसेवकांवर पूर्ण विश्वास आहे”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




