नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा नेमकी कोणाला मिळणार, यावरून महायुतीत (Mahayuti) अद्यापही सस्पेन्स कायम आहे. ही जागा शिवसेनेला (Shivsena) सुटणार असल्याची चर्चा जोर धरत असली, तरी महायुतीकडून अधिकृत घोषणा न झाल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. अशा राजकीय संभ्रमावस्थेतही उमेदवारी अर्ज खरेदी करणाऱ्यांची लगबग सुरूच असून, शनिवारी (दि. ३०) माजी स्थायी सभापती गणेश गिते (Ganesh Gite) यांनी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात ‘श्री गणेशा’ केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सात उमेदवारांनी १४ उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) खरेदी केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (दि.१) अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी उमेदवारी दाखल करणाऱ्यांची भाऊ गर्दी होणार की ठराविकच उमेदवार फॉर्म भरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शनिवारी (दि. ३०) रोजी उमेदवारी अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये माजी आमदार अनिल कदम (शिवसेना उबाठा) विजय करंजकर (शिवसेना शिंदे गट), गोकुळ बबनराव गिते (दोन अपक्ष व भाजप), अनिकेत विजय पाटील (भाजप व अपक्ष), बापू पिंगळे (भाजप), संजय खंडेराव गिते (अपक्ष), मंगेश विजय खैरनार (अपक्ष) अशा सात जणांनी १४ उमेदवारी अर्ज खरेदी केले.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : महायुतीच्या गोटात धुसफूस; दराडे, गिते आणि आहेर लढण्यावर ठाम
गितेंनी केला ‘श्री गणेशा’
गणेश गिते यांनी भाजपकडून (BJP) एक व अपक्ष म्हणून एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा श्री गणेशा केला आहे. गिते यांच्या दोन्हीही उमेदवारी अर्जांवर सूचक म्हणून दिनकर पाटील, संगीता घोटेकर, नितीन निगळ, प्रशांत दिवे, आदिती पांडे, रंजना भानसी, दिपाली गिते, सुरेश आण्णा पाटील, राजेंद्र आहेर व सोनाली भंदुरे या भाजप नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हे देखील वाचा : Prajakt Tanpure : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश; अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार?




