
मुंबई | Mumbai
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या कायदेशीर प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले. हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीमध्ये ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आहे, आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या त्या अमान्य आहेत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा गैरवापर झाला, ज्या पद्धतीने त्या यंत्रणेचा गैरवापर झाला ते लोकशाहीसाठी घातक आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. पक्षाच्या स्थापनेशी संबंधित सर्व कागदपत्रे शरद पवार यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे पक्षावरील कायदेशीर अधिकार नेमका कोणाचा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्याकडे पक्षाची कागदपत्रे होती. त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई सुरू ठेवणार आहे,” असा निर्धार खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. “मी हा पक्ष माझ्यासाठी किंवा आमच्यापैकी कोणासाठी मागत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त आणि फक्त शरद पवारांसाठी मागत आहे” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पण आम्हाला तारीखच मिळत नाही, हे दुर्दैव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमचे प्रकरण आजही सुरु असून आम्ही वारंवार तारखेची मागणी करत आहोत. आज तारीख लागली तर मी आजच सर्वोच्च न्यायालयात जाईन. पण आम्हाला तारीखच मिळत नाही, हे दुर्दैव आहे” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणांची सुनावणी वेगवेगळी असली, तरी दोन्ही प्रकरणांमध्ये पक्षाच्या मालकीचा आणि घटनात्मक प्रक्रियेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणे एकत्रितपणे ऐकावीत,” अशी मागणी त्यांनी केली.
हा देश संविधानाने चालतो, उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकत का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवली असल्याने शिवसेना ही त्यांचीच राहते, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी तोफ डागली.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोग आणि फोडाफोडीवरून जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले, हे अतिशय अयोग्य आहे आणि कोणत्याही संविधानाच्या चौकटीत बसत नाही. निवडणूक आयोगाचा (Election Commission) ज्या पद्धतीने गैरवापर झाला, ते एका सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली आणि ते हयात असताना त्यांनी ती उद्धवजींच्या हातात दिली. त्यामुळे शिवसेना ही फक्त उद्धवजींचीच असू शकते, कोणाचे वेगळे मत असते, तर त्यांनी राज ठाकरेंसारखी वेगळी चूल मांडून स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहायला हवे होते, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.




