मुंबई | Mumbai
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. अशोक खरातचे कारनामे आता समोर येत असून धक्कादायक माहिती समोर येण्यासोबत गंभीर आरोप देखील होऊ लागले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया देत, खरात प्रकरणात ज्याचं नावं आहेत, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार, असे वक्तव्य केले. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वरिष्ठ नेत्यांची येत्या दोन दिवसांत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत चाकणकर यांची बाजू ऐकून घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी काय म्हंटले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत प्रफुल पटेल यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. त्यानुसार, “याप्रकरणी चौकशी केली जाईल. चौकशीदरम्यान ज्या कोणाची नावे समोर येतील, त्यांच्यावर कारवाई तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाईल. काही राजकीय नेत्यांचे नाव त्यांच्याशी (भोंदू बाबा अशोक खरात) जोडले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून कारवाई केली जाईल. ही कारवाई पुढील दोन-तीन दिवसांत दिसेल”, असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले.
राष्ट्रवादीची वेट अँड वॉचची भुमिका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यत्वे खालील मुद्द्यांवर खल होणार आहे. या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा नेमका किती आणि कसा सहभाग आहे, याची शहानिशा पक्षपातळीवर केली जाईल. केवळ आरोपांच्या आधारे कारवाई करण्याऐवजी, स्वतः रुपाली चाकणकर यांचे या प्रकरणावर काय म्हणणे आहे, हे वरिष्ठ नेते जाणून घेतील. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ हे केवळ राजकीय हेतुने प्रेरित आहेत की त्यात तथ्य आहे, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. या फोटोंचा आधार घेत विरोधकांनी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या घटनात्मक पदावर असताना अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीशी संबंध असणे हे दुर्दैवी आहे, अशी टीका होत आहे. आता याप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
खरातला २४ मार्चपर्यंत कोठडी
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या पेन ड्राईव्हमध्ये सापडलेल्या ५८ व्हिडिओने खबळबळ उडाली आहे. बलात्काराचा संशयित आरोपी अशोक खरात याला अटक करण्यात आली असून २४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्योतिष, अंकशास्त्र, तंत्रमंत्र या बुवाबाजीच्या आडून त्याने महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे.





