
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. पुराचा वेग आणि त्याची तीव्रता इतकी भीषण आहे की यामध्ये ४६९ जणांचा मृत्यू झाला असून १५०० च्या वर नागरिक आणि पर्यटक बेपत्ता झाले आहे. हजारो घरे, पुल, दळवळणाची साधने उद्धवस्थ झाली आहे. नेपाळमधील याच परिस्थितीचे भयावह चित्र दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या समोर येत आहे. काही भागांमध्ये अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधीही मिळाली नाही. पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की, अनेक गावेच्या गावे पाण्याखाली गेली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे. या महाविनाशकारी पुरादरम्यानचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जो पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका धडकी भरवणाऱ्या व्हिडीओमध्ये पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांची घबराट दिसून येते. या व्हिडीओमध्ये एक कुटुंब पुराच्या भीषण वेढ्यात अडकल्याचे दिसत आहे. घराच्या चारही बाजूंनी महापुराचे प्रचंड पाणी वेगाने वाहत असून संपूर्ण घर पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. जीव वाचवण्यासाठी हे कुटुंब घराच्या बाल्कनीत आणि छतावर थांबले आहे. पुराच्या भीतीने थरथरणाऱ्या या कुटुंबातील सदस्य जीव वाचवण्यासाठी हात जोडून अत्यंत हताशपणे देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.
नेपाळमध्ये पुन्हा महापुराचं संकट; आधीच्या पुरापेक्षा ५ पट धोका वाढला, प्रशासनाकडून अलर्ट जारी
नेपाळच्या रासुवा आणि परिसरातील भागांना या आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. हिमनदी कोसळल्यानंतर पाणी, बर्फ, दगड आणि चिखलाचा प्रचंड लोंढा नदीच्या प्रवाहात आल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली.
पुराच्या पाण्याने अनेक वस्त्यांमध्ये प्रवेश केल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. काही ठिकाणी संपूर्ण परिसर चिखल आणि ढिगाऱ्याखाली गेला आहे. रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे बचाव पथकांनाही प्रभावित भागांपर्यंत पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे. या महापुराच्या तडाख्यानंतर २९० भारतीय नागरिकांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या बेपत्ता भारतीयांचा तातडीने शोध घेण्यासाठी मदत यंत्रणा आणि भारतीय दूतावासाकडून वेगाने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, नेपाळ लष्कराच्या एका तुकडीने त्रिशूली जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या ३५० कामगारांची आणि कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. या प्रकल्पात अनेक भारतीय कामगारही कार्यरत होते; नेपाळ लष्कराने बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांना यशस्वीरित्या बाहेर काढले आहे.




