नाशिक | प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्हा आणि परिसरात पुढील ४८ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यात ३०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची भीती असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि वनविभाग पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
या ठिकाणांवर पोलिसांचा वॉच
संभाव्य पूरस्थिती आणि दुर्घटना टाळण्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी सोमवारी सायंकाळापासूनच मंगळवार आणि बुधवारपर्यंत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गंगापूर धरण, आनंदवल्ली, रामकुंड, पंचवटी, तपोवन ते माडसांगवीपर्यंतच्या गोदावरी नदीपात्रावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
अशोक शरमाळे, गजेंद्र पाटील, संजय पिसे व मृदुला नाईक यांची विशेष पथके बॅक वॉटर, डॅम परिसर, चांदशी, गोदाघाट व तपोवनात तैनात करण्यात आली आहेत. शनिवारी आणि रविवारी धबधबे व बॅक वॉटर परिसरात कडक पेट्रोलिंग (गस्त) केली जाईल, तसेच नाकाबंदीसाठी विशेष अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मृदुला नाईक यांनी दिली.
आपत्कालीन नियोजन तयार
त्र्यंबकेश्वरसह धरण क्षेत्रात ३०० मि.मी. पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग, जिल्हा प्रशासन आणि शहर व ग्रामीण पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. गंगापूर धरणातून मोठा विसर्ग करावा लागल्यास नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, गंगेसह टाळकुटेश्वर भागातील नदीपात्रात पूरपरिस्थिती असतानाही वाहने धुणायांवर पोलीस प्रशासनाची नजर राहणार असून त्यांच्यावर कड़क कायदेशीर कारवाई केली जाईल.
ग्रामीण भागातही शाळांना सुटी
ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाकडून सर्व पोलीस ठाण्यांना अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सर्व पोलीस पाटील ग्रुप आणि जनसंवाद ग्रुप सतर्क करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत थेट नागरिकांपर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. संभाव्य अतिवृष्टी पाहता मंगळवारी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. ‘आपली सुरक्षा आपली जबाबदारी’ हे लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पर्यटकांना ‘नो एन्ट्री’! वनविभागाचे आदेश
अतिवृष्टीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मल (नाशिक) आणि शेखर देवकर (त्र्यंबकेश्वर) यांनी पुढील आदेश येईपर्यंत प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद केली आहेत.
- अंजनेरी गड आणि परिसर दुगारवाडी धबधबा
- हरिहर गड, पहिने पर्यटन क्षेत्र, भावली धरण परिसर.
नाशिक ग्रामीण, शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
१. अतिवृष्टीदरम्यान पुरग्रस्त रस्ते, पूल, नदी व नाल्यांच्या जवळ जाणे पूर्णपणे टाळा.
२. : मुसळधार पावसामुळे सप्तशृंगी (वणी) गडावर दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक गर्दी करू नका.
३. : घाट रस्त्यांवर किंवा धोकादायक ठिकाणी वाहने थांबवून फोटो अथवा व्हिडिओ काढू नका.
४.: सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या बाबींवर, मेसेजवर विश्वास ठेवू नका, केवळ प्रशासकीय अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या.
५. संकटसमयी त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष ०२५३-२४५२२२२, ८५५२९ ६३२५१ किंवा ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




