मुंबई | Mumbai
लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत. याचदरम्यान, मुंबई काल भाजपकडून जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाली होती. यामुळे वाहतुकी कोंडी झाली होती. यावेळी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना एक महिलेच्या रोषाचा सामना करावा लागला. यामुळे गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्या महिलेचे बाजू घेत भाजपाला इशारा दिला आहे.
वरळीच्या जांबोरी मैदानातून सुरुवात झालेला हा मोर्चा एनएससीआय डोमपर्यंत नेण्यात आला. मात्र या जनआक्रोश मोर्चामुळं जांबोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळं संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला.

महिलेचा गिरीश महाजनांसमोर संताप
सदर महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला. तुमचं हे काय चाललंय?, इथून चालते व्हा…शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात?, असा सवालही महिलने उपस्थित केला. संतापलेल्या महिलेने उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला. इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात?, असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला. दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकारानंतर भाजपवर निशाणा साधला आहे.
‘हजारोंसे भारी… एक नारी’
रोहित पवार यांनी ट्विट करत या महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केले आहे. ही नारी शक्ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे.” त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधकांनी याला ‘नारी शक्तीचा विजय’ म्हटले आहे.
तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो ‘नारी शक्ती’
फक्त कौतुकच नाही, तर रोहित पवारांनी सरकारला सावधही केले आहे. “आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो,” अशी भीती व्यक्त करत त्यांनी इशारा दिला की, “जर तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो ‘नारी शक्ती’ पुढे येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटरा फाडतील.”




