चांदवड | प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला असून कांद्याला योग्य हमी भाव मिळावा यासाठी नाशिकमधील चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुंबई-आग्रा महामार्गावर क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. शेकडो उत्पादक, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सकाळपासून सुरू झालेल्या या मोर्चात अनेक मागण्या करण्यात आल्या आहे. आंदोलक कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे.
कांदा उत्पादकांकडून सकाळपासूनच क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाविकास आघाडीतर्फे आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आंबादास दानवे, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे, नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभाताई बच्छाव आदी नेते पदाधिकारी उपस्थि होते.
गळ्यात कांद्याच्या माळा घालत आंदोलन
अनेक नेत्यांनी यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्याचे दिसून आले. काही नेते बैलगाडीवर बसले होते. काही दिवसांपूर्वी कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत आम्ही आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील सरकारी कांदा खरेदीचा 1235 रुपये दर 1580 रुपयांपर्यंत वाढवला. 18 तारखेला आंदोलनातून दबाव पडला म्हणून 3.5 रुपये वाढले. सरकारने कांद्याचे प्रति किलोचे दर 24 रुपयांपर्यंत घेऊन जावेत, ही आमची आग्रही मागणी असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या आजचे नवे दर
सरकारची ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार
आमदार रोहित पवार यांनी, शेतकऱ्यांनी फक्त ट्रेलर दाखवताच केंद्र सरकार घाबरले, पण आता खरा पिक्चर दाखवण्याची वेळ आली असल्याचे म्हणत इशारा दिला आहे. मुंबई-आग्रा हायवे चांदवडमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे. केंद्र सरकारने नाफेडद्वारे केली जाणारी कांदा खरेदी 12 रुपये 35 पैशांवरून 15 रुपये 80 पैसे करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच सरकारने कांदा दरात अंदाजे साडेतीन रुपयांची वाढ केली. सरकारची ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे. अशी आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांचा उत्पादनाचा खर्च देखील निघत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान २४ रुपये भाव हवा अशी मागणी या वेळी केली. नाफेडच्या बगलबच्चांनी आताही कांदा खरेदी करुन ठेवला आहे. भाव वाढल्यानंतर ते नाफेडला भाव वाढल्यानंतर विकतील. नाफेडला आमची विनंती आहे त्यांनी मार्केट कमिटीत विक्री करावी यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळेल.
सरकारने ८ ते १० लाख टन कांदा खरेदी करावा. हा कांदा देशात कुठेही विकायचा नाही. भारताच्या बाहेर कांदा विक्री झाला नाही तर जाळून टाका. एवढे मोठे आंदोलन सुरू आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाचे नेते कोणाला तिकीट द्यायचे, नगरसेवकांना किती रुपयात विकत घायचे, याचा विचार करत असल्याची चर्चा मुंबईमध्ये सुरू आहे.
आंदोलनावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सरकार भाव जाहीर करत आहे, पण प्रत्यक्षात खरेदी होत नाही. केवळ घोषणा करून काही उपयोग नाही,” असे ते म्हणाले.
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिकच्या चांदवड येथे कांद्याच्या दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चिघळल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करत वाहनांच्या रांगांकडे धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव करताच दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी धरपकड करत आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.




