Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 21

अवैध धंद्यांसह अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करा – आ. खताळ

0

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेरात सुरू असणारे अवैध धंदे आणि अनधिकृत कत्तलखान्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असा प्रश्न निर्माण करणार्‍या विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस अधिकार्‍यांनी करावे. तसेच शहरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून अनधिकृत चालणारे सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करावे, असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर, तालुका व घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांना दिले.

संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृहावर संगमनेर शहर, तालुका, घारगाव या तीनही पोलीस ठाण्यातील गुन्हेगारीबाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आणि घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार खताळ म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी शहरात सुरू असणारे सर्व अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते. पोलिसांनी मागील आठवड्यात तीन ते चार ठिकाणी कत्तलखान्यांवर कारवाया केल्या आहेत. यापुढे अशा ठिकाणी निदर्शनास आल्यावर ज्या हद्दीत असतील तेथील प्रशासनाने, नगरपालिका प्रशासनाने नोटिसा देऊन अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात यावे. तसेच शहरात मटका, जुगार, अवैध दारू, अंमली पदार्थ, गुटखा, ऑनलाईन लॉटरी हे सर्व अवैध धंदे बंद करावे. अवैध धंदे करणारे कोणीही असो त्यांचा बंदोबस्त करावा.

अवैध धंद्यांना कुठल्याही प्रकारचे पाठबळ दिले जाणार नाही असे आमदार खताळ यांनी ठणकावून सांगितले. शहर, तालुका आणि घारगाव या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब तसेच बेकायदेशीर चक्री, ऑनलाईन लॉटरी सुरू आहे, त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना दिल्या. याचबरोबर पोलीस स्थानकामध्ये आलेल्या तक्रारदारांबरोबर कर्मचार्‍यांचे वर्तन सभ्यपणाचे असावे, उध्दटपणे वागू नये असे सांगितले.

प्रभारी अधिकार्‍यांकडून घेतला आढावा…
संगमनेर तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आत्तापर्यंत किती घरफोड्या, चोर्‍या, सोनसाखळी चोरी झाल्या आहेत. यातील दाखल गुन्ह्यांपैकी किती गुन्हे उघडकीस आले आणि किती आले नाही याबाबतचा सविस्तर आढावा तीनही पोलीस ठाण्याच्या प्रमुखांकडून घेण्यात आला. तसेच मागील आठवड्यात अकोले नाका येथे काही अवैध धंदे करणार्‍या व्यक्तींनी मारहाण केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. ते पुन्हा असे कृत्य करणार नाही यासाठी वेळप्रसंगी त्यांची गावातून धिंड काढावी. कत्तलखान्याच्या चालक-मालकांवर वारंवार गुन्हे दाखल होऊन कारवाया केलेल्या आहेत. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी या कलमाखाली कारवाई करून तडीपार करण्याबाबतही आमदार अमोल खताळ यांनी सूचना दिल्या.

Onion Price : वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

0

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सोमवार दि. 28 एप्रिल रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Onion Market) झालेल्या कांदा लिलावात 3 हजार 48 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 300 रुपये, दोन नंबरचा कांदा 605 रुपये ते 1000 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 600 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 500 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 17 कांदा गोण्यांना 1 हजार 400 रुपये भाव मिळाला.

गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर

0

धुळे : राज्यात उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक वाढण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या उद्योगांना आवश्यक त्या सोयीसुविधा व सवलती देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. धुळयातील गुंतवणूक परिषदेत झालेले 8436 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार हे जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आकर्षिंत करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट, धुळे येथे एक दिवसीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल होते. या कार्यक्रमास खा. डॉ शोभा बच्छाव, आ. काशिराम पावरा, मंजुळा गावीत, अनुप अग्रवाल, माजीमंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालक वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांच्यासह विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. त्यानुसार दावोसमध्ये 15 लाख कोटी रुपयांचे करार केले आहे. धुळे जिल्ह्यात उद्योगांसाठी रावेर येथील 2 हजार एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. तसेच राज्यात कुठलेही बांधकाम करण्यासाठी आता नदीची वाळू (नैसर्गिक रेती) लागणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दगडापासून रेती तयार करण्याचे 50 क्रेशरला मंजूरी देण्यात येणार आहे. येत्या काळात साक्रीला औद्योगिक विकास महामंडळ, तसेच धुळ्यात ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच सर्व उद्योजकांना सर्व परवानग्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, आम्हाला विधानमंडळ आणि मंत्रालय समजायला तीन वर्ष लागले. आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी सहा महिन्यांत समजून घेतले. आणि त्यांनी आपल्या सामाजिक कामाची छाप पाडली आहे. धुळे जिल्ह्यास पालकमंत्री जयकुमार रावल यांचा सारखा लोकप्रिय, अष्टपैलुत्व व्यक्तिमत्त्व असणारा पालकमंत्री लाभला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शांती स्पिन्टेक्स लिमिटेड 1 हजार कोटी, एच.डी. वायर प्रा.लि. 2 हजार कोटी, बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड 460 कोटी, सनस्टॉर लिमिटेड 320 कोटी, आशिर्वाद इलेक्ट्रॉनिक्स 20 कोटी, पियुष लाईफस्पेस प्रा. लि. 110 कोटी यासह 119 विविध कंपन्यांचे 8436 कोटी 41 लाख रुपंयाचे सामंजस्य करार करण्यात आला. यातून 11506 जणांना रोजगार निर्मिती होणार आहे.

या परिषदेला मध्यप्रदेश, गुजरात राज्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील उद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार, व्यापारी, तसेच इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार आणि ओटीटी प्लॅटफॉर्मना नोटीस; अश्लील कंटेंटच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी

0
सुप्रीम

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेबाबत असणाऱ्या चिंतेशी सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे. तसेच ही अश्लीलता दूर करण्यासाठी केंद्राने कायद्याच्या चौकटीत काहीतरी करावे असा सल्लाही दिला आहे. सोमवारी, सर्वोच्च न्यायालयात पोर्नोग्राफिक कंटेंटच्या ऑनलाइन स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्र सरकार आणि ९ ओटीटी-सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर मागितले आहे.

केंद्र सरकारतर्फे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, ओटीटी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंटबाबत काही नियम आधीच अस्तित्वात आहेत. सरकार आणखी नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने वकील विष्णू शंकर जैन यांनी बाजू मांडली. पत्रकार आणि माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती बी आर गवई आणि ए जी मसीह यांच्या खंडपीठाने केंद्र आणि नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, अल्ट बालाजी, उल्लू डिजिटल आणि मुबी यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि एक्स कॉर्प, गुगल, मेटा इंक आणि अॅपल यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस बजावली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना म्हणाले “काहीतरी करा… काहीतरी कायदेशीर करा” असे सांगितले.

काही नियमित कार्यक्रमांमध्येही आक्षेपार्ह मजकूर दिसून येतो याकडे लक्ष वेधत तुषार मेहता म्हणाले की, काही इतके विकृत आहेत की दोन लोकही एकत्र बसून पाहू शकत नाहीत. मेहता यांनी यादरम्यान सेन्सॉरशिप नसावी हे अधोरेखित करताना “काही नियम आहेत, काही चिंतनात आहेत,” अशी माहिती दिली. याचिकाकर्त्याच्या वतीने वकील विष्णू शंकर जैन यांनी बाजू मांडली. खरे तर, ओटीटी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अश्लील सामग्रीवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याचा असा युक्तिवाद आहे की अशा कंटेन्टचा तरुणांवर आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतो.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी २१ एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी केली होती. तरीही न्यायालयाने म्हटले होते की याचिकेत उपस्थित केलेला मुद्दा हा धोरणात्मक विषय आहे आणि तो केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात येतो. या संदर्भात नियम बनवणे हे केंद्राचे काम आहे. न्यायमूर्ती गवई म्हणाले होते, ‘आमच्यावर कार्यकारी आणि कायदेमंडळाच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जात आहे.’

“चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि सॉफ्ट-कोअर अॅडल्ट कंटेंट यांच्या अनियंत्रित प्रसारामुळे महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या वाढत्या प्रवृत्तीला चालना मिळत असून, तरुणांच्या मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम झाला आहे,” अशी चिंताही सुप्रीम कोर्टाने मांडली.

याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की “त्यांनी सक्षम अधिकारी, संस्था इत्यादींसमोर निवेदनं, तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यांचे कोणतेही परिणाम झालेले नाहीत. या परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे माहिती असतानाही सरकार या धोक्याचे नियमन करण्यासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात अपयशी ठरले आहे”.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

मुलगी IAS झाल्याच्या आनंदोत्सवात वडिलांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

0
तीव्र

यवतमाळ | Yavatmal
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे आनंदाचा क्षण दुसऱ्या मिनिटाला दु:खात बदलला.मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे असे मृत्यू झालेल्या बापाचे नाव आहे. खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.

प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकरी म्हणून निवड झाली. मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून साजरा केला जात असताना प्रल्हाद खंदारे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. कार्यक्रमादरम्यानच प्रल्हाद खंदारे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी महागाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात एका मुलीने आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबीयांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, आनंदात असतानाच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे मुलीच्या यशाचा आनंद आणि कुटुंबातील सदस्यांचा उत्साह दु:खात बदलला. प्रल्हाद खंदारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आयएएस झालेली मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Neha Singh Rathore : पहलगाम हल्ल्यासंदर्भात ‘चिथावणीखोर’ पोस्ट; गायिका नेहा सिंग राठोड विरुद्ध देशद्रोहाचा गु्न्हा

0

दिल्ली । Delhi

प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिच्याविरुद्ध लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत तिच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले असून अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई अलीकडील काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेहा सिंग राठोड हिनं सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया संदर्भात करण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी नेहाने तिच्या एक्स (माजी ट्विटर) खात्यावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण केल्याचा आरोप केला होता.

नेहा सिंग राठोडच्या पोस्टमध्ये असेही म्हटले होते की, “पुलवामा हल्ल्याच्या वेळी जसे भाजपाने मते मिळवण्यासाठी देशातील वातावरण तापवले होते, तसेच पुन्हा घडवले जाईल.” या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

https://x.com/nehafolksinger/status/1916378387431756034

पोलीस तक्रारीनुसार, नेहाची पोस्ट जातीपातीवर आधारित असून त्यामुळे समाजात द्वेष पसरू शकतो आणि देशविरोधी भावना निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, नेहाच्या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तिच्यावर बीएनएस २०२३ च्या विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली असून सखोल चौकशी सुरू आहे.

गायिका नेहा सिंग राठोड ही बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये लोकगीत गायनासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या गाण्यांमध्ये सामाजिक आणि राजकीय विषयांवर थेट टीका करण्यात येते, त्यामुळे ती अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. हा प्रकार घडल्यामुळे सोशल मीडियावरही दोन गट पडले आहेत. काहींनी नेहाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी तिच्या वक्तव्यांवर टीका करत कडक कारवाईची मागणी केली आहे. लखनऊ पोलिसांनी सांगितले की, प्रकरण गांभीर्याने घेतले गेले असून कायद्याच्या चौकटीत पुढील कार्यवाही केली जाईल.

Omar Abdullah: आलेल्या पर्यटकांना सुखरुप पाठविण्याची जबाबदारी माझी होती, पण…; जम्मु काश्मीरचे CM ओमर अब्दुल्लाह विधानसभेत झाले भावुक

0
ओमर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, याचा निषेध केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे म्हटले आहे. त्यातच, जम्मू काश्मीरमध्ये या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भावनिक होत भाषण केले.

सभागृहात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ही काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात आहे. लोक जेव्हा आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. ही त्याची सुरुवात आहे. आपण असे काहीही बोलू नये किंवा दाखवू नये ज्यामुळे या चळवळीला हानी पोहोचेल. जेव्हा लोक आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. आणि आता असे दिसते की लोक त्या टप्प्यावर पोहोचत आहेत.”

ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याबाबत जम्मू काश्मीर सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी बंदुकीच्या माध्यमातून दहशतवादावर फक्त नियंत्रण मिळवता येईल. पण तो संपवला जाऊ शकत नाही. लोक जेव्हा आपल्यासोबत असतील, तेव्हाच तो संपुष्टात येईल. आज लोक आपल्यासोबत असल्याचे मला वाटत आहे, अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री या नात्याने आपण पर्यटकांना निमंत्रण दिले होते. आलेल्या पाहुण्यांना, पर्यटकांना सुखरुप येथून पाठविण्याची जबाबदारी माझी होती. पण, नाही पाठवू शकलो. माफी मागायला माझ्याकडे शब्द नाहीत. काय बोलू त्यांना, त्या लहान मुलांना, ज्यांनी आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्या नेव्ही ऑफिसरच्या विधवा पत्नीला काय बोलू, जिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, असे भावनिक उद्गार ओमर अब्दुल्लांनी सभागृहात काढले. यावेळी, उपस्थित सदस्यांना बाकही त्यांनी वाजवू दिले नाहीत, आज नको.. असे म्हणत बाक वाजवणाऱ्यांना त्यांनी थाबवले. त्यांच्या या कृत्याने सभागृह स्तब्ध झाले होते.

या हल्ल्यात तेथील स्थानिक रहिवासी असलेला आदील नावाचा तरुण मृत्युमुखी पडला. यावरही अब्दुल्ला यांनी भाष्य केले. आदिलने आपल्या जीवाची बाजी लावून पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जम्मू काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी ही इथे निवडून आलेल्या सरकारची नाही. सध्याच्या घटनेचा फायदा घेऊन मी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणार नाही. कारण ही योग्य वेळ नाही. आम्ही या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, असे आश्वासनही ओमर अब्दुल्ला यांनी दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Harshvardhan Sapkal : सब गोलमाल है भाई सब गोलमाल है; हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर जळजळीत टीका

0

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील ईडी कार्यालयात रविवारी पहाटे आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीत भीषण आग लागल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीचे कार्यालयही याच इमारतीत आहे.

मुंबईच्या ईडी कार्यालयाच्या इमारतीला आग लागली यावर राजकीय पडसाद पडत आहेत. “सब गोलमाल है सब गोलमाल है सिद्धे रस्ते की ये टेडी चाल है ईडीने आपले स्वतः चेच कार्यालय जाळून घेतले”, अशा कडक शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दहा वर्षात विरोधकांना जेरीस आणण्याकरिता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी, विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांना पक्षांतर करण्यास बाध्य करण्यासाठी ईडीच्या कार्यालयाचा उपयोग झाला आहे. आता त्यांच्या विरोधात कुठलेच पुरावे नाही हा कांगावा करण्यासाठी ईडीने आपले कार्यालयच जाळून टाकले. अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Central Government Decision : केंद्र सरकारचा पाकिस्तानला दणका; १६ यूट्यूब चॅनेलवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

0

नवी दिल्ली | New Delhi

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून (India) पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून (Home Ministry) १६ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर,आरजू काजमी आणि सय्यद मजम्मिल शाह यांच्या चॅनेल्सचाही समावेश आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यामागे पाकिस्तानातील (Pakistan) दहशतवादी संघटनांचा हात असून, केंद्र सरकारकडून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

या चॅनेल्सवर जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत, भारताचे सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि संवेदनशील माहिती खोटी व दिशाभूल करणार्‍या स्वरूपात पसरवल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये Dawn News, Samaa TV, Ary News, Geo News या चॅनेल्सचा समावेश आहे.

दरम्यान, यूट्यूबवर (Youtube) हे चॅनेल्स सर्च केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा आणि वा सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित केंद्र सरकारच्या आदेशानुसार हे चॅनेल्स सद्यस्थितीत या देशात उपलब्ध नाही. सरकारच्या बंदीशी संबंधित अधिक माहितीसाठी गुगल पारदर्शक रिपोर्टवर जा असा मेसेज दाखवत आहे.

Asaduddin Owaisi : “आमच्या देशाच्या लष्कराचं जेवढं बजेट तेवढं तुमच्या…”; पहलगाम हल्ल्यावरून असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर निशाणा

0

मुंबई | Mumbai 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानला अणवस्त्रांवरुन सुनावले आहे. ते परभणी येथील सभेत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, “आमच्या देशाच्या लष्कराचे जेवढं बजेट आहे तेवढं तुमच्या देशाचं आहे. पाकिस्तान (Pakistan) भारतापेक्षा अर्धा तास नाही तर ५० वर्षे मागे आहे.पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नये. पाकिस्तानकडून वारंवार सांगितले जाते की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या देशात जाऊन निर्दोषांची हत्या कराल तर कुठलाच देश गप्प बसणार नाही. धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात? तुमच्या कृती नरकाहून वाईट आहेत. आयएसआयएसचा (ISIS) वारसा तुम्ही पुढे चालवत आहात, त्यामुळे आम्हाला शिकवू नका,” असे ओवैसी यांनी म्हटले.

तसेच “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तान आजच नाही गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या (India) कुरापती काढतो आहे. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. काही टीव्ही चॅनल्सचे अँकर्स हे काश्मिरी नागरिकांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे. काश्मीर आपले आहे आणि आपलंच राहिल. भारताचे अभिन्न अंग म्हणजे काश्मीर. आपण काश्मिरी लोकांवर संशय कसा घेऊ शकतो? एक काश्मिरी माणूस होता ज्याने दहशतवाद्यांशी लढताना प्राण गमावले अशा लोकांवर आपण संशय घेता कामा नये”, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.