Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 22

दिल्लीत अग्नितांडव; ८०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

0

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

दिल्लीतील रोहिणी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन सुमारे ८०० झोपड्यांना आग लागली. सर्व झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. ही घटना रोहिणी सेक्टर १७ मध्ये घडली. या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला. तसेच, ५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली .

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी या मुद्द्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी पीडितांना तातडीने मदत करण्याची विनंती केली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या २६ गाड्यांनी अथक परिश्रम घेतले. या दरम्यान, दोन मुलांचे मृतदेह सापडले, जे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

0

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे .शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे.त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी प्रक्रिया बाकी आहे अशा शिधापत्रिकाधारकांनी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील 38 लाख 57 हजार 664 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाला देण्यात आले आहे. अंदाजे जिल्ह्यातील 82 टक्के ई- केवायसी प्रकिया पूर्ण झाली आहे.अद्यापही पाच लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारंकाची ई केवायसी प्रकिया अपूर्ण आहे.. शासनाने रेशन धारकांना केवायसी करणे बंधनकारण केले आहे. या शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण करावी अन्यथा रेशन बंद होण्याचा इशारा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे.

शिधापत्रिकाधारकांनी मेरा-केवायसी अ‍ॅप वापरण्याचे आवाहन
ई-केवायसी करण्यासाठी रेशन दुकानात गर्दी होत असल्याने शासनाने मेरा-केवायसी अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती भरुन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शिधापत्रिकारधारकांनी 30 एप्रिलपर्यंत ई केवायसी पूर्ण करावी.

Nashik News : नाशिकच्या विमान प्रवासी संख्येत ५४ टक्के वाढ

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विमानाने (Plane) जाणाऱ्या पर्यटकांचा आलेख उंचावत असून गत मार्चच्या तुलनेत ५४ टक्के प्रवासी संख्या वाढल्याचे चित्र आहे. यासोबतच कार्गोसेवेतून मालवाहतुकीमध्येही प्रचंड वाढ झाली असून कार्गोसेवेत शंभर पटीने वाढ झाली आहे. नाशिक विमानतळ हे नागरिक, उद्योजक व व्यापारीवर्गासाठी उपयुक्त असून मार्च २०२५ मध्ये ३४,३४९ प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला. गत मार्च २०२४ मध्ये २२,२६९ प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला होता. मार्च महिन्यातील ही प्रवासीवाढ ५४ टक्के झाली आहे.

संपूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास २०२३-२४ मध्ये २ लाख ४२ हजार ३७२ प्रवाशांनी (Passenger) तर २०२४-२५ मध्ये ३ लाख ४१ हजार ११२ प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. वर्षभरातील ही वाढ ४० टक्केच दिसून येत आहे. नाशिक विमानतळावरून कार्गो सेवेमध्येही कमालीची वाढ झाली आहे. मार्च २०२४ मध्ये १८८ मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली होती. त्यात देशांतर्गत शून्य मेट्रिक टन तर आंतरराष्ट्रीय स्तरावर १८८ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली होती.

दरम्यान, हेच प्रमाण मार्च २०२५ मध्ये ६६२ मेट्रिक टनावर गेले आहे. त्यात देशांतर्गत १३.६ मेट्रिक टन तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ६४९ मेट्रिक टन एवढे झाले आहे. संपूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास २०२३-२४ मध्ये संपूर्ण वर्षात देश-विदेशात ४६३ मेट्रिक टन मालवाहतूक झाली तर हेच प्रमाण २०२४-२५ मध्ये ४,२८० मेट्रिक टन एवढे झाले आहे.

नाशिकची विमानसेवा ही गेल्या काही वर्षात विकसित होत गेली आहे. नाशिकमध्ये खूप क्षमता आहे. त्यामुळे मागील वर्षात झालेली प्रवासीवाढ व कार्गो सेवावाढ ही उत्साहवर्धक आहे. नाशिकमधून आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा सुरू झालेली असल्यामुळेच कार्गोची आकडेवारी वेगाने वाढली आहे. विमानसेवा वाढवण्यासाठी तसेच विमानतळाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन समिती, निमा

विमानसेवेची क्षमता ही नाशिकमध्ये होतीच. मात्र ही आकडेवारी लक्षात घेत विमानसेवा सुरू करण्यासाठी घाबरत असलेल्या विमान कंपन्यांसाठी हे आशादायी आहे. नवनव्या विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल. दिल्लीसाठी दुसऱ्या फ्लाईटची मागणी आहे. ती लवकरच पूर्णदेखील होईल.

जयेश तळेगावकर

Nashik News : महाराष्ट्रदिनी समृद्धी महामार्ग होणार खुला; नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर होणार कमी

0

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

राज्याच्या दळणवळणाला ‘समृद्ध’ करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर (Mumbai to Nagpur) हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) १ मे महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) पार्श्वभूमीवर पूर्ण क्षमतेने खुला होण्याची शक्यता आहे. या महामार्गाचा अखेरचा नाशिक-मुंबई हा टप्पा महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी खुला केला जाण्याची शक्यता असल्याने, नाशिक-मुंबई हे अंतर अवघ्या अडीच तासांवर येणार आहे.

इगतपुरी ते आमणे (Igatpuri To Aamane) या टप्प्यातील ७६ किमी लांबी नाशिक व ठाणे जिल्ह्यात येते. या टप्प्यामध्ये कसारा घाटात एकूण पाच बोगदे असून, या बोगद्यांची एकूण लांबी ११ किमी आहे. त्यातील इगतपुरी ते कसारा दरम्यान दुतर्फा बोगदा ७.८ किमी लांबीचा असून, हा देशातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा बोगदा आहे. या बोगद्याची उंची ९.१२ मीटर आहे. या बोगद्यामुळे केवळ आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा (Igatpuri to Kasara) हे अंतर पार करता येणार आहे. कसारा घाटाला पर्यायी मार्ग म्हणून या महामार्गाकडे पाहिले जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक जलद होणार आहे. त्याचा फायदा नाशिकच्या दळणवळणाला होणार आहे. रस्ते विकास महामंडळाने ५५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्चुन ७०१ किमी लांबीचा २४ जिल्ह्यांना जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें समुद्धी महामार्ग उभारून राज्याचे दळणवळण गतिमान केले आहे. आतापर्यंत या महामार्गाचे टप्प्याने लोकार्पण करण्यात आले असून, ६२५ किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आता अखेरचा इगतपुरी-आमणे, भिवंडी हा ७६ किमीचा टप्पा पुढील मे महिन्यात खुला केला जाणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्याला होणार असून, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता नाशिकहून अवघ्या अडीच तासांत गाठता येणार आहे. मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात नाशिकला स्थान असले तरी, मुंबई-पुणे, नाशिकचा म्हणावा तसा विकास झाला नाही यास दळणवळण हे प्रमुख कारण मानले जाते. समृद्धीमुळे नाशिक मुंबईच्या अधिक जवळ जाणार असल्याने, त्याचा मोठा फायदा नाशिकच्या (Nashik) विकासाला होणार असल्याने अखेरचा टप्पा लवकर खुला केला जावा, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.

Pahalgam Terrorist Attack : आतापर्यंत ‘इतक्या’ पाकिस्तान्यांनी देश सोडला

0

जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर निर्णय घेतला असून, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले होते.

आज, 27 एप्रिल, हा पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा अंतिम दिवस आहे. मात्र, वैद्यकीय व्हिसा असलेल्या नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा (दीर्घकालीन, राजनैतिक आणि वैद्यकीय व्हिसा वगळता) 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत.

राज्य सरकारे त्यांच्या भागातील पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेत त्यांना परत पाठवत आहेत. दिल्ली, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हे काम वेगाने सुरू आहे. अमृतसर जिल्ह्यातील अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून, वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

दरम्यान, भारतातील अडकलेले भारतीय नागरिकही मोठ्या प्रमाणावर मायदेशी परतत आहेत. गेल्या तीन दिवसांत अटारी-वाघा सीमेवरून 450 हून अधिक भारतीयांनी भारतात प्रवेश केला आहे.

अटारी-वाघा आंतरराष्ट्रीय सीमेवरील आकडेवारीनुसार, 24 एप्रिल रोजी 28 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले, तर 105 भारतीय नागरिक भारतात आले. 25 एप्रिलला 191 पाकिस्तानी नागरिकांनी परत प्रवास केला, तर 287 भारतीय भारतात आले. 26 एप्रिल रोजी 75 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडले आणि 335 भारतीय मायदेशी परतले.

अटारी सीमेवर माध्यमांशी संवाद साधताना अनेक पाकिस्तानी नागरिकांनी सांगितले की, ते नातेवाईकांच्या भेटीसाठी किंवा विवाह समारंभासाठी भारतात आले होते. मात्र, आता त्यांना कार्यक्रम अपूर्ण ठेवूनच घरी परतावे लागत आहे.

Indus Water Treaty : “सिंधू पाणी वाटप करार स्थगित केलाच नाही”; ‘त्या’ पत्राचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

0

मुंबई | Mumbai 

जम्मू-काश्मीरातील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी नाव विचारून गोळीबार (Firing) करत दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर भारताने पाकिस्तानबाबत पाच मोठे निर्णय घेत कोंडी केली. त्यामध्ये, पाकिस्तानची सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली, याशिवाय पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारताने (India) सिंधू पाणी वाटप कराराला (Indus Water Treaty) स्थगिती दिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दि. २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारने सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “केंद्र सरकारने (Central Government) पाकिस्तानला सिंधू नदीचे पाणी बंद करण्यात आल्याचे पत्र दिले आहे. मात्र, त्या पत्रात कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही.धरणातील पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को असं हे पत्र आहे. त्यामुळे जनतेला हे पत्र दाखवले तर सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करते हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून सरकारने याकडे डोळे झाक करू नये. या सगळ्यात फक्त पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना बाहेर काढता येत आहे, एवढीच वस्तूस्थिती आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानी (Pakistani) नेत्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही.कारण ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते सिंधू वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर सातत्याने पोकळ धमक्या देत आहेत. कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. आता सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला असेल तर सरकारने त्याची फॉलोअप ऍक्शन घ्यायला हवी”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Crime News : महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने केली लंपास, पोलिसांत तक्रार दाखल

0

शिरूर । तालुका प्रतिनिधी

शिरूर परिसरात एका प्रवाशाची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीत १६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८८ हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय पुणे-नगर हायवेवर नगरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसने प्रवास करत होते. व्हिजन इंटरनॅशनल स्कूलजवळ त्यांच्या बसला अचानक बिघाड आल्याने सर्व प्रवासी खाली उतरले.

या दरम्यान, फिर्यादी, त्यांची पत्नी शांतम्मा आणि मुलगा मिळून रस्ता ओलांडून गुजरमळा, शिरूर येथील साईलंच होम शेजारी असलेल्या एका मार्बलच्या दुकानात गेले. तिथे विक्रीसाठी ठेवलेली मार्बलची मंदिरे पाहण्यास ते थांबले. मार्बलची मंदिरे पाहताना शांतम्मा यांनी त्यांच्या जवळची पर्स दुकानात बाहेर विक्रीसाठी ठेवलेल्या एका मार्बलच्या मंदिराजवळ ठेवली होती. मंदिरे पाहिल्यानंतर बसकडे परत जाताना त्यांनी पर्स उचलण्यासाठी पाहिले असता, ती जागेवर दिसून आली नाही. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली, मात्र पर्स कुठेच सापडली नाही. अज्ञात चोरट्याने पर्स लंपास केल्याचे स्पष्ट झाले.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या पर्समध्ये १० ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची अंगठी, ६.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, ८८ हजार रुपये रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन होता. एकूण चोरून नेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे २ लाख ३ हजार ५०० रुपये इतकी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप यांनी तपास सुरू केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरट्याचा शोध सुरू आहे.

Sharad Pawar : “जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता…”; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शरद पवारांचे वक्तव्य

0

पुणे | Pune

जम्मू-काश्मीरातील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मन की बात या कार्यक्रमातून बोलतांना दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही असे म्हणत इशारा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता नसते’ असे म्हणत भाष्य केले आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “भारतवासीयांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे राजकारणात मतभिन्नता असेल. पण जेव्हा देशावर (Country) हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही. आत्ता भूमिका एकच देश एकत्र ठेवणे. त्यानंतर या गोष्टींचा विचार करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण पहलगामचा विषय ऐकत आहोत. अतिरेक्यांनी हल्ले केले. निष्पाप लोकांचा बळी घेतला. जे काही घडलं ती घटना देशाला धक्का होती. हा कुठलाही जाती-धर्माला धक्का नव्हता. हा भारताला धक्का होता. . त्यामुळे आता देशवासीयांसाठी राजकारणात मतभिन्नता नाही,”असे शरद पवार यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने (Central Government) दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीला आपल्या पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, देशाच्या गृहमंत्र्यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली. त्यांनी हे सांगितलं की कुठेतरी कमतरता आमच्याकडून झाली. या कमतरतेवर आज चर्चा नाही. ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विश्वासाचे वातावरण कसं निर्माण करता येईल हे आता बघितले पाहिजे”, असे शरद पवार यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “आज देश संकटात असताना काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू”, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. तसेच “शरद पवार एक विचार आहे. ज्या पद्धतीने आजचे राजकारण सुरू आहे, ते देशासमोरील सगळ्यात मोठे आव्हान आहे. आज विचारहीन राजकारण सुरु असून, लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल, संविधानात जिवंत ठेवायचं असेल, तर समाजवादाशिवाय पर्याय नाही,” असे रावसाहेब पवार यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ…”; मंत्री झिरवाळांचे मोठे विधान

0

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) बसलेल्या झटक्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केली. या योजनेच्या परिणामी महायुतीला लाडक्या बहि‍णींनी भरभरून मतदान केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

राज्याची आर्थिक परिस्थिती बघता सरकारचे हे आश्वासन अधांतरात असल्याचे दिसत आहे. अशातच आता राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी २१०० रुपयांबाबत मोठे विधान केले आहे. झिरवाळ हे जळगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना २१०० रुपये कधी मिळणार?असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर झिरवाळ यांनी उत्तर देत मोठे विधान केले आहे.

यावेळी ते म्हणाले की, “लाडक्या बहिणी नाराज आहेत, हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना (Ladki Bahin) २१०० रुपये देण्याचे कोणीही जाहीर केलेले नाही”, असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. झिरवाळ यांनी केलेल्या विधानावरून त्यांनी २१०० रुपयांवरून पलटी मारल्याचे दिसून येत आहे.

तसेच झिरवाळ यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, “यापूर्वी विरोधक असा दावा करत होते की सरकार १५०० रुपये देखील देणार नाही. मात्र, सरकारने १५०० रुपये दिल्यावर विरोधक आता २१०० रुपयांचा मुद्दा उचलून धरत आहे. माझ्या मते १५०० रुपयांची रक्कमही पुरेशी आहे आणि अनेक महिलाही (Women) मिळालेल्या मदतीबद्दल आनंदी आहेत”, असा दावाही त्यांनी केला.

लाडक्या बहीणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहीणींना या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्याबाबत आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aaditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो. तर नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात, त्यांना ५०० रुपये मिळतील हे योजनेचे दोन शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आले होते”, असे देखील त्यांनी म्हटले.

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी कोण गाठणार?

0

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट (Mumbai Indians and Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Delhi Capitals and Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. आरसीबी आणि दिल्लीचा सामना नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर आणि मुंबई व लखनऊचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे.

मुंबई इंडियन्सला आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ५ पैकी १ विजय आणि ४ पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुंबईने दुसऱ्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्ज, सनरायझर्स हैदराबाद विरूध्द सलग ४ सामन्यात विजय (Win) संपादन करून जबरदस्त कमबॅक केले आहे. आता लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभूत करून आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा षटकार मारण्यासाठी लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज असणार आहे.

विशेष म्हणजे लखनौ सुपर जायंट्स संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूध्द पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा पराभव विसरून नव्या उमेदीने मैदानावर (Ground) उतरण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स सज्ज असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत ७ सामने खेळविण्यात आले असून, लखनौ सुपर जायंट्स संघाचा हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास वरचष्मा राहिला आहे. उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे.

आरसीबी आणि दिल्ली यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बंगळूरु संघाला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी बंगळूरु मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघ बंगळूरु संघाला सलग दुसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी आणि उपांत्य फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित करण्यासाठी सज्ज असणार आहे.

दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३२ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास बंगळुरू संघाने १९ तर दिल्ली कॅपिटल्सने १२ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये १० सामने खेळविण्यात आले असून, बंगळूरु संघाने ६ तसेच दिल्ली कॅपिटल्सने ४ सामन्यात बाजी मारली आहे.