Sunday, May 4, 2025
Home Blog Page 33

Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

दिल्ली । Delhi

ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. व्हॅटिकन कार्डिनलच्या म्हणण्यानुसार, पोपने आज स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते.

१४ फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर न्यूमोनिया आणि अशक्तपणाचा उपचारही सुरू होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना ५ आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान, कॅथोलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनने म्हटले होते की पोपच्या रक्त तपासणी अहवालात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसून आली. याव्यतिरिक्त, प्लेटलेट्सची कमतरता देखील आढळून आली. तथापि, नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Nashik News : मुख्यमंत्री घेणार सिंहस्थ तयारीचा आढावा; आज मंत्रालयात बैठक

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर सिंहस्थात महत्वपूर्ण ठरणाऱ्या रिंगरोडच्या कामाचे सादरीकरण सोमवारी (दि. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासमोर संबंधित विभागाकडून करण्यात येणार आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित राहणार आहेत.

नाशिक व त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थाच्या नियोजनासाठी बैठका घेण्यात येत आहेत. मात्र अंतिम आराखड्याला मंजुरी मिळत नसल्याने सिंहस्थाची कामे प्रत्यक्षात सुरू होण्यास विलंब होत आहेत. त्यातच सर्वाधिक वेळ लागणारा आणि सर्वाधिक खर्चिक प्रकल्प रिंगरोडचा आहे. दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना बाह्य रिंगरोडचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रिंगरोडचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एमएसआरडीसी सादर केला होता. एमएसआरडीसीने या प्रकल्पासाठी पुण्यातील मोनार्क या सल्लागार संस्थेमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. मोनार्क या सल्लागार संस्थेने महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पाथर्डी ते आडगाव दरम्यान ६० मीटर रुंदीचा बाहा रिंगरोड, तसेच आडगाव ते गरवारे पॉइंट या दरम्यान ३६ मीटर रुंदीचा बाहा रिंगरोडचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला होता.

नवीन भूसंपादन कायद्यानुसार मनपा हद्दीत रिंगरोडसाठी (Ring Road) भूसंपादन मोबदल्यापोटी अडीच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च जास्त असल्याने मोनार्क कंपनीने एनएमआरडीएच्या हद्दीतही सर्वेक्षण केले होते. बीओटीवर रिंगरोड उभारणीचा प्रस्ताव कंपनीने एमएसआरडीसीला दिला होता. या दोन्ही प्रस्तावांचे सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीसांसमोर केले जाणार आहे.

 

BCCI Annual Contract : बीसीसीआयकडून वार्षिक करारामधील खेळाडूंची यादी जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट

0

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुरूष संघाच्या केंद्रीय वार्षिक कराराची (१ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५) यादी जाहीर केली आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे.  या यादीमध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यासह टीम इंडियाचा (Team India) स्टार युवा खेळाडू अभिषेक शर्मा याचाही समावेश करण्यात आला आहे.

सदर यादीत श्रेयस अय्यरला (Shreyas Lyer) बी प्लस श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तसेच ईशान किशनचा समावेश सी श्रेणीत करण्यात आला आहे. याआधी बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला काढून टाकण्यात आले होते. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांना अजूनही त्याच श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, हा करार (Contracts) १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. या करारमध्ये खेळाडूंना ठरलेल्या ग्रेडनुसार मानधन मिळते. यामधील ए+ ग्रेडला वर्षाला ७ कोटी, ए ग्रेडला ५ कोटी, बी ग्रेडला ३ कोटी आणि सी ग्रेडमध्ये येणाऱ्या खेळाडूंना (Players) १ कोटी असे मानधन मिळते.

बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेली केंद्रीय करार यादी खालीलप्रमाणे

ग्रेड A+ : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा
ग्रेड A : मोहम्मद सिराज, के.एल. राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत
ग्रेड B : सुर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर
ग्रेड C : रिंकू सिंह, तिलक वर्मा, शिवम दुबे, रवी बिश्नोइ, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृ्ष्णा, ध्रुव जुरेल, रजत पाटीदार, सर्फराज खान, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, इशान किशन, आकाश दीप, वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा

 

 

Nashik News : सातपीर दर्गाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाच्या वतीने शहरातील द्वारका भागातील (Dwarka Area) हजरत सातपीर बाबा दर्गा अतिक्रमणावर झालेली कारवाई बेकायदेशीर आहे. दर्ग्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा करत मनपा विरुध्द सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेण्यात आली होती. मनपाने १६ एप्रिल रोजी त्या ठिकाणी दुसऱ्यांदा कारवाई करुन अतिक्रमण काढले, तर त्याच दिवशी दुपारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती आदेश दिले, मात्र तोपर्यंत कारवाई झालेली होती. आता आज त्याची सुनावणी होत असून त्याकडे लक्ष लागले आहे.

मनपाला दर्गा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली नव्हती, तसे कोणतेही पत्र देखील प्राप्त झालेले नव्हते. असा दावा मनपाच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेला स्थगिती आदेश मनपाला (NMC) १७ एप्रिलला दुपारी मिळाला आहे. उद्या मनपा आपली बाजू मांडणार असल्याची माहिती मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली.

दरम्यान, द्वारका परिसरातील सातपीर बाबा दर्गा येथे मंगळवारी रात्री अतिक्रमणावरून (Encroachment) झालेल्या वादावरून तुफान राडा झाला होता. पोलिसांनी त्याबाबत कारवाई सुरू केली असून या संपूर्ण परिसरातील रस्ते बंद होते तर जवळपास खुले करण्यात आले आहे. बॅरेकेटिंग बाजूला करुन मार्ग सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी तणावपूर्ण शांतता कायम आहे. परिसरात पोलिसांनी (Police) चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Ashwini Bidre Case: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप

0

मुंबई । Mumbai

बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला असून, मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत त्याच्यावर २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर हे दोघेही अटक झाल्यापासून सात वर्षांपासून तुरुंगात असल्याने, त्यांची शिक्षा पूर्ण झाल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे या दोघांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश कोर्टाने तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. त्यांची अधिकृत रिलीज ऑर्डर लवकरच जारी होणार आहे. अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी आरोपींकडून कोणतीही भरपाई नको असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले होते. त्यामुळे न्यायालयाने भरपाईबाबत कोणताही आदेश दिलेला नाही.

या प्रकरणात केवळ आरोपींच्यावर नव्हे, तर सरकारी यंत्रणांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहेत की, अश्विनी बिद्रे यांना मिळणाऱ्या पगाराची भरपाई द्यावी. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. विशेष म्हणजे, कोर्टाने नवी मुंबई पोलीस आयुक्तांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, ज्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे, त्यांच्याविरोधात विभागीय शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाची नीट चौकशी न करता, आरोपींसाठी राष्ट्रपती पदकाची शिफारस केली होती. अशा अधिकाऱ्यांविरोधात कारवाई अनिवार्य असल्याचे कोर्टाने नमूद केले.

तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे. आरोपींवर कारवाई न करता, त्यांना पाठिशी घालणारी भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याने न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले. न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आरोपींना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत आरोपी अपील दाखल करू शकतात.

अश्विनी बिद्रे या नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या. २०१५ मध्ये त्या बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा खून झाल्याचा आरोप अभय कुरुंदकरवर ठेवण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींनी तिचा खून करून मृतदेह लपविल्याचे समोर आले होते. या प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा खळबळ उडवून दिली होती.

Rahul Gandhi : राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा; म्हणाले, “निवडणूक प्रक्रियेत गंभीर…”

0

दिल्ली । Delhi

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर शंका उपस्थित करत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं उदाहरण देत थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

राहुल गांधी बोस्टनमधील एका विद्यापीठात झालेल्या चर्चासत्रात बोलत होते. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेतील आकडे संशयास्पद आहेत. “सायंकाळी साडे पाच वाजता आम्हाला दिलेल्या आकड्यांनंतर, पुढील दोन तासांत तब्बल 65 लाख मते पडली,” असा दावा त्यांनी केला.

राहुल म्हणाले, “मतदान प्रक्रियेला सरासरी तीन मिनिटे लागतात. अशा वेगात 65 लाख मते पडणे अशक्य आहे. यासाठी तर मतदारांना रात्री दोन वाजेपासून रांगेत उभं राहायला हवं होतं, पण तसं काही घडलं नाही.”

त्यांनी यासंदर्भात व्हिडिओग्राफी मागितली होती, पण निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला, अशी माहितीही राहुल गांधींनी दिली. इतकंच नव्हे, तर “व्हिडिओ मागण्यास प्रतिबंध करणारा कायदा बदलण्यात आला,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर चार आरोप

  • पाच वर्षांत लोकसभा निवडणुकीसाठी 32 लाख मतदार जोडले गेले, पण त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत विधानसभेसाठी 39 लाख नवीन मतदार नोंदले गेले.
  • पाच महिन्यांत इतके जास्त मतदार कसे नोंदवले गेले, यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
  • राज्यातील एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा नोंदणीकृत मतदार जास्त कसे काय झाले? यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
  • कामठी मतदारसंघाचे उदाहरण देत राहुल म्हणाले की, भाजपच्या विजयाचे अंतर तेथील नव्या मतदारांच्या संख्येइतकेच आहे.

राहुल गांधींनी याआधीही फेब्रुवारी महिन्यात पत्रकार परिषद घेऊन हेच मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीपूर्वी 32 लाख आणि विधानसभेपूर्वी 39 लाख नवीन मतदारांची नोंद झाली. म्हणजे पाच महिन्यांत सात लाख मतदार वाढले.” काँग्रेसने मतदार यादीसह, त्यातील नावं आणि पत्त्यांची माहिती मागवली आहे. त्यांनी असेही म्हटले की, “अनेक दलित आणि अल्पसंख्यांक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. आम्ही कोणावर थेट आरोप करत नाही, पण काहीतरी गडबड झाली आहे हे नक्की.”

राहुल गांधींच्या आरोपांव्यतिरिक्त, काँग्रेसने हरियाणातील ऑक्टोबर 2024 मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही संशय व्यक्त केला होता. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा दावा केला होता. खेरा म्हणाले की, “20 जागांवर मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड आढळून आला. ज्या मशीनमध्ये 99 टक्के बॅटरी चार्ज होती, त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हरले, आणि जिथे 60-70 टक्के चार्ज होती, तिथे आमचे उमेदवार जिंकले.” त्यांनी मागणी केली की अशा मशीन सील करून तपास होईपर्यंत सुरक्षित ठेवाव्यात.

Gold Price : सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर; ओलांडला एक लाखाचा टप्पा, जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई | Mumbai

मागील काही दिवसांत सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दराने (Gold Rate) आज (सोमवारी) १ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांचा खिसा आता आणखी रिकामा होणार आहे. सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या एक तोळ्याचा म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव ९९ हजार ५०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता सोने खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेल्याचे दिसत आहे.

सध्या चीन आणि अमेरिकेतील (China and America) व्यापार युद्ध सुरू आहे. यातून जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम आपल्याला जाणवू लागला आहे. अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत. अधिक परतावा हवा असेल तर सोनं खरेदी करा असा सल्लाही गुंतवणूक तज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, येत्या ३० एप्रिलला अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) असून, हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज होता. मात्र, त्यापूर्वीच सोन्याच्या भावाने लाखाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल, अशी शक्यता आहे.

सोन्याचे भाव (Gold Rate Today)

२२ कॅरेट (22k Gold Price)

सध्या १ ग्रॅम सोने ९,०१५ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७२,१२० रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ९०,१५० रुपये आहे. आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत (24k Gold Price)

१ ग्रॅम सोन्याची किंमत ९,८३५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोने ७८,६८० रुपयांना विकले जात आहे. १ तोळा सोन्याची किंमत ९८,३५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ७७० रुपयांनी वाढ झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

८ ग्रॅम सोन्याची किंमत ५९००८ रुपये आहे.१ तोळा सोन्याची किंमत ७३,७६० रुपये आहे. या किंमतीत ५७० रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीची किंमत (Silver Price)

आज चांदीच्या किंमती स्थिरावल्या आहेत. १० ग्रॅम चांदी १,०१० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत १०,१०० रुपये आहे. चांदीच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ झाली आहे.चांदीचे दर जीएसटी सहित १ लाख ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. दुपारी बारावाजेनंतर सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊन सोन्याचे दर एक लाखांवर पोचतील, अशी माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे.

संपादकीय : २१ एप्रिल २०२५ – स्व शिस्त महत्वाची नाही का?

0

महाराष्ट्र राज्यात वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याला कायद्याने बंदी आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे गेल्या वर्षभरात सुमारे पाच हजार चालकांना महागात पडले आहे. त्यांच्याकडूनच नव्हे तर चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणार्‍या आणि दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणार्‍या वाहनचालकांवर संबंधित विभागाने कायदेशीर कारवाई केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तसे ते अधूनमधून प्रसिद्ध होतच असते. कारण अशी कारवाई सातत्याने सुरु असते असे मानले जाते.

वाहन कसे चालवायचे आणि कसे नाही याचे ढीगभर नियम आहेत. कायदे आहेत. जबर आर्थिक दंडाची तरतूद आहे. पण मुळात वाहन एकाग्रतेने चालवावे लागते इतके सामान्य ज्ञानही माणसांकडे नसावे का? त्यासाठी सतत नियम बनवण्याची-त्यात कालानुरूप बदल करण्याची वेळ सरकारवर का यावी? कायदा आणि सुव्यवथा राखणे हे सरकारचे काम आहे पण लोक त्याचे पालन तरी करतात का? त्याबाबतही ठणठणपाळच आढळतो. तसा तो नसता तर कारवाईचे आकडे प्रसिद्ध झाले नसते. मुळात कोणतेही काम अपेक्षितरित्या पूर्ण करण्यासाठी एकाग्रता आवश्यक मानली जाते. ते काम करताना लक्ष विचलित झाले तर कामावर परिणाम होतोच पण साध्यही प्रभावित होते.

वाहन चालवतांना ही चूक किंवा सवय अधिक घातक बनू शकते. कारण तिथे थेट अनेकांच्या जीवाशी गाठ पडू शकते एवढी साधी गोष्ट वाहनचालकांच्या लक्षात का बरे येत नसावी? लक्ष विचलित झाले की अपघाताचा धोका वाढतो. रस्ते अपघातांचे ते एक प्रमुख कारण मानले जाते. अपघातात वाहनचालकासह अन्य व्यक्तींचा जीव धोक्यात येऊ शकतो. दुर्दैवाने अपघात झालाच तर बळी जातात. त्यांच्या कुटुंबियांवर आघात होतात. काहींना आयुष्यभर जखमा सहन कराव्या लागतात. वाट्याला आयुष्यभर अपंगत्व येणे किंवा आयुष्य परावलंबी हेही वेदनादायकच.

माणसांना महत्त्वाचे काम असू शकेल. एखादा महत्त्वाचा निरोपही असू शकेल. तथापि वाहन थांबवून मोबाईलवर बोलणे अधिक हिताचे ठरते. त्यासाठी नियम मोडलाच पाहिजे का? निर्धोक वाहतुकीच्या सुविधा ही जशी सरकारची जबाबदारी तद्वतच जीवाची काळजी ही वाहनचालकांची जबाबदारी आहे. ती देखील सरकारनेच करायची असेल तर वाहनचालकांनी काय करायचे? अनेक वाहनचालक नियम पाळतात. तथापि बेजबाबदार वाहनचालकांमुळे त्यांची ती कृती अर्थहीन ठरण्याचा मोठाच धोका असतो त्याचे काय? तेव्हा ज्याच्या त्याच्या जीवाचे रक्षण करणे ही ज्याची त्याची पण जबाबदारी नाही का?

Ahilyanagar : वर्षभरापासून 99 ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतिक्षा

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतिक्षा आहे. गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नसल्याने मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार की नाही? याकडे गावकारभार्‍यांचे लक्ष आहे.

दरम्यान, 25 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील पुढील पाच वर्षाच्या कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे.त्यानंतर निवडणूका जाहीर होण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनला आहे. गेल्या वर्षभरापासून नगर जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींसह 197 ठिकाणी पोटनिवडणूका झालेल्या नाहीत. या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार 19 मार्चला प्रभागनिहाय प्रारूप मतदार प्रसिध्द करण्यात. या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेवून 27 मार्चला या ठिकाणी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. दरम्यान, नगरसह राज्यातील मुदत जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका रखडलेले आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

मागील महिन्यांत राज्य सरकारने जातीच्या प्रवर्गानूसार लोकसंख्येची माहिती राज्य सरकारने घेतलेली आहे. त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण अंतिम करून ते 25 एप्रिलपर्यंत अंतिम करण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून अकोले 8 ग्रामपंचायती, संगमनेर 2 ग्रामपंचायती, कोपरगाव 3 ग्रामपंचायती, राहाता 1, श्रीरामपूरमधील 2 ग्रामपंचायती, राहुरी तालुक्यातील 3 ग्रामपंचायती, नेवासा तालुक्यातील 26 ग्रामपंचायती, शेवगाव 6 ग्रामपंचायती, पाथर्डी 4 तालुक्यातील, जामखेड 3, श्रीगोंदा 1, कर्जत 8, पारनेर 1 ग्रामपंचायत आणि नगर तालुक्यातील 7 ग्रामपंचायती अशा 84 ग्रामपंचायत आणि 155 सदस्य यांचा समावेश आहे.

तर 2025 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील 6, संगमनेर 2, कर्जत 2, पारनेर 2 आणि अकोले तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ठिकाणी गाव कारभार्‍यांना निवडणुकांची प्रतिक्षा आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीसाठी निवडणूका होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनला आहे.

Shrirampur : श्रीरामपूर भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवडी वादाच्या भोवर्‍यात!

0

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बहुचर्चित भाजपा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडी अखेर जाहीर झाल्या. तालुकाध्यक्षपदी माळवाडगावचे माजी सरपंच बाबासाहेब चिडे तर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या निवडी नियमबाह्य असल्याने आम्हाला मान्य नाही, असे सांगत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर तुमची काय मागणी असेल सांगा, त्या वरिष्ठांपर्यंत कळवू, असे निवडणूक प्रमुखांनी यावेळी सांगितले.

काल रविवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे भाजपा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक प्रमुख सुभाष वहाडणे, उपनिवडणूक प्रमुख योगेश गोंदकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले आदींसह पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या बैठकीत तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाची नावे जाहीर होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपा पदाधिकार्‍यांच्या झालेल्या निवडी नियमबाह्य असून या आम्हाला मान्य नाही.

याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्हाला निवडी जाहीर करायच्या होत्या तर मुलाखती का घेतल्या? असा प्रश्न माजी तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे यांच्या सह अन्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. उपस्थित पदाधिकार्‍यांनी तुमचे जे म्हणणे असेल ते आम्हाला सांगा, ते आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहच करु, असे आश्वासन देत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका समोर ठेवून भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून सदर निवडी करण्यासाठी प्रक्रीया सुरु होती. दि. 28 मार्च रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

यावेळी तालुक्यातील व शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी मुलाखती देवून शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदासाठी आपलीच वर्णी लागणार? यासाठी मोर्चेबांधणी देखील केली होती. मुलाखतीनंतर तब्बल पंधरा दिवसानंतर निवडी जाहीर करण्यात आल्या. परंतू ज्यांनी मुलाखती दिल्या नव्हत्या, त्यांचीच नावे या पदासाठी जाहीर झाल्याने उपस्थित जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला. अनेकांनी या निवडीला विरोध करत या निवडी नियमबाह्य असल्याचे सांगितले. या निवडी रद्द केल्या नाही तर आम्ही आत्मक्लेश आंदोलन करु, असा इशाराही दिला. परंतू उपस्थित पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना शांत करत तुमची मागणी वरिष्ठांपर्यंत कळवू असे आश्वासन दिले. त्यामुळे भाजपा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडी वादाच्या भोवर्‍यात सापडल्याची चर्चा काल दिवसभर शहरात व तालुक्यात सुरु होती.