Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजThackeray Brothers Alliance : उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा कधी होणार?...

Thackeray Brothers Alliance : उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा कधी होणार? परब, नांदगावकरांनी दिवस सांगितला, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) (काल) सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह (Mumbai) राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष ठाकरे बंधूंकडून युतीची अधिकृत घोषणा कधी होते याकडे लागले होते. तर आज (मंगळवारी) माध्यमांशी बोलतांना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी येत्या आठवड्यात युतीची घोषणा होऊ शकते असे म्हटले होते. त्यानंतर राऊत यांनी राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीची संभाव्य तारीख समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी म्हणजे (१८ किंवा १९ डिसेंबरला) होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या-कोणत्या महापालिकेत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे प्रचार करतांना दिसून येणार आहेत. ठाकरे बंधूंच्या एकजूटीमुळे मुंबई, नाशिक, पुणे यासह विविध महापालिकांमध्ये चुरस बघायला मिळणार आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : महापालिकांचं बिगुल वाजलं अन् राऊतांनी टायमिंग साधलं; ठाकरे बंधूंच्या युतीबाबत केले मोठे विधान

दुसरीकडे मनसेकडून शिवाजी पार्क येथे ११ आणि १२ जानेवारीला सभा घेण्यासाठी पोलिसांकडे परवानगीचे पत्र देण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबई महानगरपालिकेच्या प्रचार सभेसाठी मनसेने पालिका आणि पोलिसांना पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदान शेवटच्या सभेसाठी मिळावे याकरिता महापालिकेकडे पत्र पाठवण्यात आल्याचे बोलले जाते. काल सायंकाळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका कार्यालयात शिवाजी पार्क मैदान १२ जानेवारीसाठी मिळावे यासाठी पत्र दिल्याचे समजते.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब काय म्हणाले?

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब म्हणाले की, मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा कधी करायची याचा निर्णय दोन्हीही पक्षाचे नेते घेतील. ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. सर्व गोष्टी चर्चेत आहेत. चर्चेअंती जेव्हा शेवटचा निर्णय होईल, तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला कळवलं जाईल. काँग्रेसबद्दल काहीही सांगू इच्छित नाही. एकदा याला अंतिम स्वरुप आलं की कळवू. युतीची घोषणा, कोणाबरोबर काय चर्चा, या सर्वाचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत चर्चा सांगितल्या जात नाही. अंतिम निर्णय सांगितले जातात, असे त्यांनी म्हटले.

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी ठाकरे सेनेकडून खासदार संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते. तर मनसेकडून राज ठाकरेंसह नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हजर होते. यावेळी त्यांच्यात जागावाटपाबाबत जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना बाळा नांदगावकर यांनी येत्या एक ते दोन दिवसात युतीबाबत निर्णय होईल,असे सांगितले.

ताज्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिका-इराण शस्त्रसंधीवरून राऊतांचा मोदींवर निशाणा; म्हणाले, “वॉर रुकवा...

0
मुंबई । Mumbai गेल्या ४० दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली...