मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपने आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) रामराव वडकुते आणि माया ईवनाते यांचा समावेश आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला चार तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. उद्या (दि.०५) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, त्याआधी भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत.
दुसरीकडे शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने अधिकृतपणे आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहे. तर शिंदेसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे, संजय निरुपम यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, उमेदवारीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार असून, सांयकाळी याबाबत घोषणा होऊ शकते.
हे देखील वाचा : Rajya sabha Election 2026 : भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेचे उमेदवार जाहीर; तावडे, आठवलेंसह ‘या’ दोन नवीन चेहऱ्यांना संधी
भाजपने (BJP) उमेदवारी जाहीर करताना जातीय समीकरण आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे बघायला मिळत आहेत. विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्यासह भाजपने रामराव वडकुते आणि माया ईवनाते या दोन नव्या चेहऱ्यांना उमेदवारी (Candidate) दिली आहे. यात वडकुते हे धनगर समाजातील असून, ते माजी आमदार आहेत. तर ईवनाते ह्या आदिवासी समाजातील असून, त्या नागपूरच्या माजी महापौर आहेत.
रामराव वडकुते कोण?
मूळचे मराठवाड्यातील असलेले रामराव वडकुते हे धनगर समाजातील एक प्रभावशाली चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) केली होती. जून २०१४ मध्ये त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर (MLC) निवड झाली होती. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपने त्यांची हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. वडकुते यांच्या निवडीतून पक्षाने धनगर समाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व दिले आहे. तसेच त्यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
हे देखील वाचा : Rajya sabha Election 2026 : रामदास आठवले यांचा पत्ता कट होणार? राज्यसभेसाठी भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळणार!
माया ईवनाते कोण?
माया ईवनाते या नागपूरच्या माजी महापौर असून, त्या भाजपच्या अत्यंत अभ्यासू आणि सक्रिय नेत्या मानल्या जातात. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्या ‘राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या’ (NCST) माजी सदस्या राहिल्या आहेत. या पदावर असताना त्यांना दिल्लीत राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला होता. महिला नेतृत्व, आदिवासी चेहरा आणि विदर्भातील प्रतिनिधित्व अशा तिन्ही आघाड्यांचा विचार करून भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.





