मुंबई | Mumbai
दहा राज्यांतील ३७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या आहेत. त्यानुसार १६ मार्चला राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश असून, भाजपच्या वाट्याला चार तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाऊ शकतो. उद्या (दि.०५) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
यात माजी मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) रामराव वडकुते आणि माया ईवनाते यांचा समावेश आहे. भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आग्रही होते. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी माध्यमाशी बोलतांना व्यक्त केल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
हे देखील वाचा : Rajya sabha Election 2026 : रामदास आठवले यांचा पत्ता कट होणार? राज्यसभेसाठी भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी मिळणार!
दरम्यान, काल (मंगळवारी) दुपारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांची दिल्लीत तर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची मुंबईत (Mumbai) भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राज्यसभेची जागा (Rajyasabha Seats) मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज (बुधवारी) भाजपने राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची घोषणा केली.
रामराम वडकुते, माया ईवनाते कोण?
धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार रामराव वडकुते (Ramrao Wadkute) यांना राज्यसभेची संधी देऊन भाजपने सामाजिक समीकरणे साधली आहेत. ते हिंगोली भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देखील आहेत. तसेच यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात विविध जबाबदार्या सांभाळल्या आहेत. वडकुते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर आमदार होते.
तर माया ईवनाते (Maya Evnate) या मूळच्या विदर्भातील असून त्यांनी यापूर्वी नागपूरच्या महापौर म्हणून काम पाहिले आहे. त्या सध्या नागपूर महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात दीर्घकाळ सक्रिय असलेल्या इवनाते यांना ही उमेदवारी देऊन भाजपने निष्ठेचे फळ दिल्याचे बोलले जात आहे. तसेच विदर्भातील आदिवासी मतांवरही भाजपने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.





