पुणे | प्रतिनिधी | Pune
पुणे जिल्ह्याला (Pune District) झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील (Maval Taluka) पाटण गावावर सोमवारी पाहते निसर्गाचा भीषण प्रकोप झाला. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत नंदू तिकोणे यांचे घर डोंगरावरून आलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेले.
या भीषण दुर्घटनेत तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू (Death) झाला असून, मृतांमध्ये नंदू तिकोणे (वय ६०), माऊली तिकोणे (वय ३०) आणि अनिता तिकोणे (वय ५५) यांचा समावेश आहे . कुटुंबातील (Family) एका महिलेचा शोध सोमवारी संध्याकाळपर्यंत सरू होता. प्रशासनाने सुमारे २३ ते ३५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
हे देखील वाचा : Mumbai Rain News : मुंबईत पावासाचा रेड अलर्ट, ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार; BMC कडून महत्त्वाच्या सूचना
स्फोटासारखा आवाज आणि घर गायब
ही भीषण दुर्घटना सोमवारी पहाटे ४ ते ४:३० च्या सुमारास घडली. लोणावळा आणि मावळ परिसरात अतिवृष्टी होत असल्याने विसापूर किल्ल्याच्या डोंगरकडाचा काही भाग अचानक खचला. नंदू तिकोणे यांच्या शेजारी राहणारे प्रत्यक्षदर्शी अक्षय भोसले या घटनेचा थरार सांगताना म्हणाले की, पहाटे ४ वाजेपर्यंत तिकोणे यांचे घर व्यवस्थित दिसत होते, मात्र ४ वाजून ५ मिनिटांनी अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर पाहिले तर तिकोणे यांचे घर गायब झाले होते”. किल्ल्यावरून खाली आलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याने तिकोणे यांच्या घराचा अक्षरशः घास घेतला. तिकोणे यांच्या शेजारी राहणाऱ्या पंकज तिकोणे यांच्या घरात रात्री १५ सदस्य होते, सुदैवाने ते बचावले असले तरी या घटनेने गावकरी सुन्न झाले आहेत.
मृतदेहांचा ढिगारा आणि शोधकार्य
या दुर्घटनेत नंदू तिकोणे, माऊली तिकोणे आणि अनिता तिकोणे या तिघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबातील चौथ्या महिलेचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. दरडीच्या तडाख्यात तिकोणे यांच्या घरासह सुमारे चार घरे आली होती, ज्यामध्ये अडकलेल्या अन्य ३० ते ३५ जणांना सुदैवाने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain Update : नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील ४८ तासांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता; शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचे संकेत
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मदतीला विलंब
बचावकार्यादरम्यान प्रशासकीय त्रुटींवरून गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवकालीन वारसा असलेल्या या गावाकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मदतीसाठी निघालेल्या बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला. अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी बचाव पथकाला अडीच तास लागले, असा दावा गावकऱ्यांनी केला असून खराब रस्त्यांमुळे मदत वेळेत पोहोचली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बचावकार्याचा आढावा घेतला असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
हे देखील वाचा : Nashik Cloudburst Update : ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरासह ‘हे’ राहणार बंद; जिल्हाधिकारी काय म्हणाले?




