पिंपरी चिंचवड | Pimpri Chinchwad
मागील २ दिवसांत पुण्यात १३ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीमध्ये २४ तासात ८ जण दगावले आहेत, तर हडपसरमध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विषारी दारूमुळे पुण्यात २४ तासांत १३ जणांचा जीव गेल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच परिसरातील रहिवासी असलेल्या आणखी दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंदी असलेली हातभट्टीची गावठी ( विषारी ) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा घटनांकडे दुर्लक्ष करणारे पिंपरी-चिंचवड पोलीस कधी जागे होणार ? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
संपादकीय : २९ मे २०२६ – विश्वासाची कसोटी!
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग सखाराम फुगे (वय 57), विजय प्रकाश राठोड (वय 31), राजेंद्र प्रकाश राठोड (वय 34), राजेश राजपूत (वय 51), अकबर अजीमखान पठाण (वय 48), बाबा सय्यद अली शेख (वय 44), आनंद निकाळजे, आनंद देसाई (सर्वजण रा. फुगेवाडी) अशी मृतांची नावे आहेत. तर, भीमापा बसाप्पा पुजारी (वय 35), अक्षय अवसरमल (वय 20), सुभाष डिग्गीकर (वय 65) रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. यातील विजय आणि राजेंद्र राठोड हे सख्खे भाऊ आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनेतील सर्वजण चारशे मीटरच्या अंतरातच राहात असून, या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे.
शुक्रवारी (29 मे) समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली आहे. पुण्यात काळेपडळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत 5 जणांचा मृत्यू झाला, पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या मृत्यूप्रमाणेच ही घटना घडली. वानखेडे यानेच पिंपरी चिंचवड आणि पुण्यात दारू पोहचवल्याची माहिती आहे. मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला. अखेर त्याला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
स्थानिक आणि लोकप्रतिनिधींकडून विषारी दारूचा उघड आरोप केला जात असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र वेगळा दावा केला आहे. ८ पैकी ५ नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे मृत पावलेल्या ८ पैकी ५ व्यक्तींना मृत्यूपूर्वी तीव्र चक्कर आली होती, अशी माहिती खुद्द पोलिसांनीच दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उर्वरित मृत नागरिक आणि सध्या उपचार सुरू असलेल्या व्यक्तींची प्रकृती नेमकी दारू प्यायल्याने बिघडली होती का ? याचा तपास सध्या सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.




