नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत चर्चेदरम्यान आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी अशा एका मुद्द्याचा उल्लेख केला ज्यामुळे यूपीए सरकारही अडचणीत आले. तसेच महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने नवीन मतदार आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या वर्षी झालेल्या या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमध्ये विसंगती आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावासंबंधी चर्चेत बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर फक्त पाचच महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नावे जोडण्यात आली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्रात हिमाचलच्या बरोबरीने मतदारांची भर पडल्याचे राहुल गांधींनी लोकसभेत सवाल उपस्थित केलाय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण लोकसंख्येइतके नवीन मतदार मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. ही मतदारांची संख्या कुठून आली? असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.
यावेळी त्यांनी शिर्डीचे उदाहरण दिले. शिर्डीमध्ये एका ठिकाणी ७००० मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे नवीन मतदार हे भाजपला ज्या ठिकाणी आघाडी मिळाली आहे, त्या ठिकाणी जोडण्यात आले आहेत असे राहुल गांधी म्हणाले. मी आरोप करत नाही, मी फक्त असे म्हणत आहे की निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकीची आकडेवारी काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (एसपी) यांना द्यावी असेही राहुल गांधी म्हणाले.
यापूर्वी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारांची संख्या वाढल्याबाबत निवडणूक आयोगाकडे उत्तरे मागितली होती. पाच महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक मतदारांमध्ये आश्चर्यकारक वाढ झाल्याचा दावा काँग्रेसने यापूर्वी केला होता.
राहुल गांधी यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने कोणतेही उत्तर दिलेले नाही पण यापूर्वी निव़़डणूक आयोगाने मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वाढल्याची किंवा कमी झाल्याची शक्यता नाकारली होती.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरोपांवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, खासदार राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहे. “हा दावा (विधान) पूर्णपणे खोटा आणि बिनबुडाचा आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर प्रत्येक मतदार यादी अपलोड केलेली आहे,” असेही शिंदे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा