राहुरी | Rahuri
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच आता शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव कर्डिले याला भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील २०२६ च्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी अक्षय शिवाजीराव कार्डिले यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र काढण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. मात्र राहुरीमधून भाजपा कोणाला तिकीट देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपाने राहुरीमधून आपला उमेदवार जाहीर केला आहे. राहुरीमधून भाजपाने अक्षय शिवाजीराव कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. वडिलांच्या निधानानंतर भाजपाने त्यांच्या मुलालाच उमेदवारी जाहीर केली आहे.

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. माजी खासदार सुजय विखे पाटील या निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी तिकिट मिळवण्याकरिता मोठी कस लावल्याची चर्चा होती. या पोट निवडणुकीसाठी आपणच पहिल्या क्रमांकाची पसंती असल्याचे सुजय विखे पाटील सांगताना दिसले. त्यामुळे राहुरीच्या पोट निवडणुकीत त्यांच्या भूमिकेविषयी कार्यकर्ते संभ्रमात दिसत असले. जनभावना लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. सुजय विखे पाटील यांनी आपल्याला तिकिट मिळण्याकरिता अनेक प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
कोण आहे अक्षय कर्डिले?
अक्षय कर्डीले सध्या भाजप युवा मोर्चाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवाजीराव कर्डीले हे अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघातून अनेकदा निवडून आले होते. त्यांचा १७ ऑक्टोबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याने अक्षय कर्डीले यांनी ‘शिव निर्धार यात्रा’ काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.





