Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray: "मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी"…; विधानसभा अध्यक्षांवर राज ठाकरेंची सडकून...

Raj Thackeray: “मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी”…; विधानसभा अध्यक्षांवर राज ठाकरेंची सडकून टीका

मुंबई | Mumbai
पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली आहे.राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात शोकप्रस्ताव वाचताना राहुल नार्वेकर यांनी केलेल्या भाषिक चुका आणि उच्चारांवर आक्षेप घेतला. आशा भोसले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली वाहताना मराठी भाषेची जपणूक आणि भाषेचे गांभीर्य अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात मराठीची चिरफाड झाल्याचा आरोप त्यांनी केला.

स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत प्रस्ताव मांडला असता तरी चाललं असतं
मनसे अध्यक्ष राज यांनी संताप व्यक्त करणारी पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. “पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही,” असा टोला राज यांनी लगावला आहे.

- Advertisement -

त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी
बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.

MSRTC News: मोठी बातमी! एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो
“सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी (स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं! पण त्यांचं म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही?” असा सवाल राज यांनी केला आहे.

मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पन्नास हजार फुटावरून चाललंय
“आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूरपर्यंत संबंध नाही! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?” असा टोला राज यांनी लगावला आहे.

सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते
“या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे. आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते,” असं राज ठाकरे म्हणाले.

मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी बेजबाबदार बुलडोझर फिरवला
“काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध,” असं राज यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...