नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धातून कोणताही देश माघार घ्यायला तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला आहे. अमेरिका आणि इराण संघर्षात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. इस्लामाबादमध्ये झालेली पहिली शांतता बैठक निष्फळ ठरली असली तरी आता पुन्हा एकदा शांतता चर्चेसाठी बैठक व्हावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. असे असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या एका विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चांना उधाण आले आहे.
अमेरिका-इराण यांच्यात गेल्या दीड महिन्यापासून संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांदरम्यान इस्लामाबादमध्ये वाटाघाटीची पहिली फेरी देखील पार पडली. मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. यानंतर अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी केली. जोपर्यंत इराण करार करत नाही, तोपर्यंत ही नाकेबंदी सुरूच राहणार असल्याचे अमेरिकेने ठामपणे सांगितले. शांतता बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमेरिका तयार आहे, परंतु, इराणने अद्याप तशी तयारी दर्शवली नाही. दोन्ही देशात समेट घडावा, यासाठी पाकिस्तानचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. यातच राजनाथ सिंह यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
राजनाथ सिंह काय म्हणाले?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जर्मनी दौऱ्यावर असताना त्यांनी बर्लिनमध्ये म्हटले की, भारताने यापूर्वीही शांततेसाठी प्रयत्न केले आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की भारत या संघर्षात मध्यस्थीची भूमिका बजावेल आणि त्यात यशही मिळवू शकेल. त्यामुळे ही शक्यता नाकारता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. तुम्हाला माहिती आहे की, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. कदाचित भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा भारत आपली भूमिका बजावेल आणि यशस्वीही होऊ शकेल, असे सूचक विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे. राजनैतिक बाबींबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन नेहमीच संतुलन आणि संवादावर आधारित राहिला आहे. भारताने सातत्याने युद्धाचा अंत आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यावर भर दिला आहे, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत गंभीर चिंता
राजनाथ सिंह यांनी यावेळी स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, या सामुद्रधुनीत कोणताही अडथळा निर्माण होणे ही भारतासाठी आर्थिक आणि सुरक्षाविषयक संकट निर्माण करणारी बाब आहे.
भारत आपल्या ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियावर अवलंबून आहे. त्यामुळे त्या भागातील अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, जग सध्या नव्या प्रकारच्या सुरक्षाविषयक धोक्यांना सामोरे जात आहे. तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल आणि जागतिक संघर्ष यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. अशा वेळी बदलत्या परिस्थितीनुसार नव्या दृष्टिकोनाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





