नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीच्या राजकारणात आजमोठा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ‘आम आदमी पक्षा’चे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत पक्षापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर राघव चड्ढा यांनी आप पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. “राईट मॅन इन राँग पार्टी” म्हणत राघव चढ्ढा यांनी आप पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
राघव चड्ढा यांनी ‘आप’ सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ते पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये सामील होत आहेत. संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत आयोजित पत्रकार परिषदेत ‘आप’चे खासदार राघव चड्ढा म्हणाले, “आम्ही, राज्यसभेतील ‘आप’चे दोन-तृतीयांश सदस्य, भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.
“मी योग्य माणूस आहे पण चुकीच्या पक्षात होतो आणि त्यामुळेच पक्षापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील १२ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेतले आहे. ज्यासाठी इतर राजकीय पक्ष घाबरतात. मोदींच्य नेतृत्त्वावर देशाची जनता विश्वास दाखवते, आतापर्यंत ३ वेळा त्यांनी विश्वास दाखवला आहे, असे म्हणत राघव चड्ढा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे कारण सांगितले आहे.
चड्ढा पुढे म्हणाले, राज्यसभेत ‘आप’चे १० खासदार आहेत आणि त्यापैकी दोन-तृतीयांशहून अधिक खासदार या बाबतीत आमच्यासोबत आहेत. त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि आज सकाळीच आम्ही ते स्वाक्षरी केलेले पत्र व संबंधित कागदपत्रे राज्यसभेच्या सभापतींकडे सादर केली आहेत.
तो पक्ष आता तत्त्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटला
” ते म्हणाले, “ज्या ‘आप’ला मी माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवले आणि माझ्या तारुण्याची १५ वर्षे समर्पित केली, तो पक्ष आता आपली तत्त्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटला आहे. हा पक्ष आता देशाच्या हितासाठी नव्हे, तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करतो. गेल्या काही वर्षांपासून मला जाणवत होते की मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे, आज मी जाहीर करतो की मी ‘आप’पासून वेगळे होत आहे आणि जनतेच्या अधिक जवळ जात आहे.”
चड्ढा यांना उपनेतेपदावरुन हटवले
२ एप्रिल रोजी, आपने राघव चड्ढा यांना पक्षाच्या राज्यसभा खासदारांच्या उपनेतेपदावरून हटवले. यासंदर्भात राज्यसभा सचिवालयाला एक पत्र सादर करण्यात आले, ज्यात म्हटले आहे की त्यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्याचा वेळ देऊ नये. आपने फागवाडा येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे (LPU) कुलगुरू अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती केली. राघव हे २०२२ पासून पंजाबमधून आपचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपेल.
राघव चड्ढांसोबत कोणते खासदार?
हरभजनसिंग
स्वाती मालीवाल
विक्रमजीत सिंह सहनी
राजेंद्र गुप्ता
संदीप पाठक
अशोक मित्तल
या घडामोडींमुळे दिल्लीसह राष्ट्रीय पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.





