नाशिक | प्रतिनिधी | Nashik
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात विविध राज्यात पर्यटनाला (Tourism) चालना देण्याच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नाशिकमध्ये (Nashik) रामकाळ पथ (Ramkal Path) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी ९९.१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. खासदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार मानले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Nashik and Trimbakeshwar) येथे विकासकामासाठीविविध प्रकारच्या मागण्या केंद्र सरकारच्या (Central Government) दरबारी मांडल्या आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत मागणी केलेल्या विविध मागण्यांच्या बाबत देखील खासदार वाजे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Winter News : निफाडचा पारा सात अंशावर; द्राक्ष उत्पादकांत चिंता
आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) यशस्वी व्हावा तसेच जिल्ह्यात मोठे प्रकल्प उभे राहावेत यासाठी पहिल्याच संसदीय अधिवेशनपासून खासदार राजाभाऊ वाजे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात राम-काळ पथ या प्रकल्पामुळे नाशिकमध्ये पर्यटन वाढीसाठी मोठा प्रकल्प आल्याने खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
असा असेल प्रकल्प
रामकाळ पथ प्रकल्प सध्या संकल्पना या स्थितीत आहे. त्यात प्रामुख्याने प्रभू श्रीरामांच्या काळातील नाशिकचे दर्शन घडवण्याच्या दृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे. ज्यात तपोवनापासून रामकुंडापर्यंत प्रभू श्रीरामांशी निगडित विविध ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास केला जाणार आहे. याकरिता आराखडा बनविण्यासाठी पर्यटन विभागाचे अधिकारी लवकरच नाशिकमध्ये येणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Assembly Elections : २२ हजार ७१९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती
रामकाळ पथ ही सुरुवात आहे. आगामी काळात अजून मोठे प्रकल्प नाशिक शहरात आणि जिल्ह्यात उभे राहतील असा माझा प्रयत्न आहे. नाशिकच्या पर्यटन क्षेत्रात भर घालण्यासाठी रामकाळ पथ हा प्रकल्प बूस्टर ठरणार आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक