देवळा | प्रतिनिधी
येथील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर भावडबारी घाटात काल दि. २२ रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान झालेल्या पहिल्याच पावसात काही प्रमाणात दरड (दगड) कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. सुदैवाने कोणतीही जिवित वा वित्तहानी झाली नाही.
या मार्गावरी ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणासह नुतनिकरणाचे काम करण्यात येत असून यासाठी घाटात मोठ्या प्रमाणात घाट कटिंगचे काम करण्यात आले. यामुळे घाटस संरक्षक जाळी न बसवल्याने डोंगरावरील ठिसूळ झालेले दगड (दरड) पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कोसळून अपघात होण्याचा धोक निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर या घाट मार्गावर संरक्षक लोखंडी जाळी डोंगराच्या भोवती बसवण्यात यावी अशी मागणी शेतकरी, व्यंगचित्रकार किरण मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे समन्वयक कुबेर जाधव यांच्यासह इतर प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे.
“राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी दरम्यान असलेल्या रस्त्यावर भावडबारी घाट रुंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. म्हसोबा देवस्थानच्या दोन्ही बाजूला अद्याप घाटकटिंगचे काम रखडले आहे. म्हसोबा महाराजांच्या जागेचे योग्य जागेवर सुरक्षीत ठिकाणी पुनर्वसन वेळेवर करणे अंत्यंत गरजेचे आहे. तसेच घाटरस्ता हा सरळ पद्धतीने कट केला असल्याने पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वेळोवेळी घडुन जिवितहानी होउ शकते. त्यावर उपाय म्हणून त्वरीत लोखंडी जाळ्या व काही ठिकाणी कठडे उभे करणे गरजेचे आहे. या घाटमार्गावर तात्काळ संरक्षक जाळी लावून रस्ता संरक्षित करावा अन्यथा त्याच जागेवर रास्ता रोको आंदोलन करून निषेध केला जाईल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी इशारा दिला आहे.




