
पुणे | Pune
पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर आता सात जणांपैकी चार जणांचा विषारी दारु पिल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणावरून आता पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचीही गय न करता दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यातील हडपसर भागात आमदार रोहित पवारंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर, त्यांनी कार्यकर्त्यांसोबत दारूच्या अड्ड्यावर आपला मोर्चा वळवला. संतापलेल्या रोहित पवारांनी स्वतः त्या अड्ड्याचा काऊंटर फोडला, तर कार्यकर्त्यांनी तेथील पत्रे उखडून टाकत संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त केला. यानंतर त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाच्या काळात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात. धर्म पाहून बुलडोझर चालवला जातो, मात्र अशा अड़्ड्यावर बुलडोझर का चालवला जात नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सामूहिक नरसंहाराला जबाबदार असलेल्या दारू अड्ड्याच्या मालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या घटनेनंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
दारु पिऊन गरीबाची माणसे मरतात, सिस्टिम काहीही करत नाही
“दारु पिऊन गरीबाची माणसे मरतात. सिस्टिम काहीही करत नाही. त्यावेळी लोकांना कायदा हातात घ्यावा लागतो. कार्यकर्त्यांनी दारु अड्ड्यांची तोडफोड केलीय. बुलडोझर धर्म बघून चालवला जातो. सामान्य लोकांचा जीव जातो, तेव्हा प्रशासन शांत बसते.” अशा शब्दात रोहित पवारांनी आपला संताप व्यक्त केला.
विधान परिषदेसाठी मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मात्र ‘या’ जागांवरुन तिन्ही पक्षांचं घोडं अडलं
म्हणूनच आरोपीला स्वतःहून शरण यायला सांगितले
“पोलिसांना विचारले असता ते म्हणतात की अजून कारण समजलेले नाही. पोलीस कोणाची तरी पाठराखण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा पुढचा तपास होऊ नये, म्हणूनच एका आरोपीला स्वतःहून शरण यायला सांगितले गेले आहे, जेणेकरून मुख्य सूत्रधार म्हणजेच मोठा मासा यातून सुटू शकेल,” असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच काही जण अत्यावस्त असल्याचे समोर आले असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी आणि दापोडी या परिसरातील 8 जणांचा गेल्या दोन दिवसांत मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच, पुण्यातील काळे पडळ भागात 3 जणांचा आणि हडपसरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, विषारी दारु प्यायल्याने यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी येथे केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून अत्यंत घातक गावठी दारू तयार करण्यात आली होती. हीच जीवघेणी दारू फुगेवाडीसह पुण्याच्या हडपसर भागातही विक्रीसाठी पाठवण्यात आली होती. प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये भरून या दारूची सर्रास विक्री केली जात होती, ज्याच्या सेवनाने हा मोठा अनर्थ ओढवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय म्हंटेल?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माझं पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं आहे. ही दारू कुठे तयार झाली, हे देखील पोलिसांनी शोधून काढलं आहे. याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजून काही लोक असू शकतात, ते शोधण्याचं काम सुरू आहे. जे लोक रूग्णालयात आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
“एकूण घटना अत्यंत गंभीर आहे. आठ लोकांना अटक केली आहे, अजून काही लोकांना अटक केली जाऊ शकते. पूर्ण साखळी शोधून अतिशय कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही एकप्रकारे हत्याच आहे. आरोपींवर अतिशय कडक कलमे लावण्यात आले आहेत,” असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं.




