
मुंबई | Mumbai
राज्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जवळपास निश्चित झाला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. विधान परिषदेच्या १७ जागांवर महाविकास आघाडी एकमत झाले आहे.
असे ठरले जागावाटप
विधान परिषदेच्या जागावाटपासाठी मविआच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. १७ पैकी १५ जागांवर मविआचे एकमत झाले आहे. काँग्रेस सर्वाधिक ८ जागा लढणार आहे. तर ठाकरेंची शिवसेना ४ तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागांवर मैदानात उतरणार आहे. पुणे, सातारा, सांगली या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. नांदेड आणि नाशिक या दोन जागांवर अद्याप तिढा कायम असून काही दिवसात यावर तोडगा निघेल असे सपकाळ म्हणाले. नांदेड आणि नाशिक या २ जागा लढण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत, यावर चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघेल.
काँग्रेस- एकूण 8 जागा
चंद्रपूर
यवतमाळ
भंडारा
अमरावती
अहिल्यानगर
सोलापूर
धाराशिव
नागपूर – पोटनिवडणूक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – एकूण 6 जागा
रायगड
जळगाव
परभणी-हिंगोली
छत्रपती संभाजीनगर
नांदेड
नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट – एकूण 3 जागा
पुणे
ठाणे
सांगली-सातारा
पैसा फेको तमाशा देखो
यावेळी बोलताना सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ५ लाखांमध्ये नगरसेवकांचे मत विकत घेतले जात असल्याचा खळबळजनक आरोप, यावेळी त्यांनी केला. “सध्या राज्यात भाजपचे ‘पैसा फेक तमाशा देख’ सुरू आहे. देवेंद्र फडणवीस व्होट चोरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले, आता पैसा फेकून निवडणुका लढत आहेत. ‘बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपय्या’ अशी त्यांची स्थिती झाली आहे,” अशी टीका केलीय.




