मुंबई | Mumbai
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला सीआयडीने चौकशीसाठी बोलावले होते की शाही पाहुणचारासाठी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर देखील विविध आरोप करत आहेत. नियमांना धाब्यावर बसवून व्हीएसआर कंपनी भारतात सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही के सिंह यांचा मुलगा रोहित सिंहचा एक व्हिडीओ देखील समोर आणला होता. ज्यात रोहित सिंह पायलट सीटवर बसून झोपल्याचे दिसत होता. या सगळ्या घडामोडीनंतर गुरुवारी व्ही के सिंह यांना सीआयडीने चौकशीसाठी बोलवले होते.
रोहित पवार आज दुपारी ४ वाजता सीआयडी कार्यालयात जाणार आहेत. सीआयडी एफआयआर दाखल करणार का, अशी चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याआधी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. व्ही. के. सिंग या चिरकूट माणसाला वाचवण्याच्या नादात अजित पवारांना न्याय नाकारला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. जे अजितदादा यांच्याबाबतीत घडले, ते इतर नेत्यांच्या बाबतीत घडू नये, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले. रोहित पवार हे विधिमंडळ परिसरात माध्यमांसोबत बोलत होते.
व्ही के सिंह यांची बडदास्त ठेवण्यात वेळ गेला?
रोहित पवार यांनी सीआयडी कार्यालयात व्ही. के. सिंह यांच्यासोबत काय घडले या संबंधी सविस्तर पोस्ट केली आहे. माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले की, “व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग हे सीआयडी कार्यालयात सकाळी ११ वाजता आले, त्यांची आठ तास चौकशी केल्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
त्याच प्रमाणे, संध्याकाळी त्यांना तिथे भारत-इंग्लंड टी-20 सामना पाहण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली. यामागे काय काळंबेरं आहे, म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असे काळ्या काचेच्या गाडीतून सोडले गेले? पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही.” असा दावा रोहित पवार यांनी केला.




