मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी मोठी बंडखोरी करत ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होता. अखेर काल रविवारी (२१) रोजी ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. धाराशिवमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून अगोदर भावना जाणून घेतल्या, आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. यादरम्यान शिवसेना नेते तानाजी सावंत हे ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतच होते. यानंतर आता ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली असून खासदार संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकरांवर जहरी टीका केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
इतिहासामध्ये अनेक गद्दार झाले, त्यांना काही भूमिका होती का? एकंदरीत गद्दारांना कोणतीही भूमिका नसते आणि ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार आहेत, अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जर कुणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटले पाहिजे, असेही राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी केंद्रातून एकनाथ शिंदे यांचा वापर केला जातोय. देवेंद्र फडणवीसांचा टांगा पलटी करण्यासाठी शिंदेंना अमित शहांचा पाठिंबा आहे. फडणवीस हे बुद्धाबळाच्या पटावर बसलेले फक्त प्यादे नाहीत.”
गद्दारांना गद्दारच म्हंटले पाहिजे
संजय राऊत पुढे म्हणाले, गद्दाराला भूमिका असते हे मी आता ऐकले. इतिहासात जे गद्दार झाले, त्यांना काही भूमिका असू शकते का? नाही न.. जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जर कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटले पाहिजे. बैमान म्हटले पाहिजे… महाराष्ट्राचे शत्रू म्हटले पाहिजे. मराठी माणसाचे दुश्मन म्हटले पाहिजे. त्यांना कोणती भूमिका आहे, त्यातून तुम्ही सर्वांनी बाहेर पडले पाहिजे. शिंदें गटामध्ये गेल्यानंतर ओम निंबाळकरांच्या वडिलांचा आत्मा त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न. आता ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्याच गटामध्ये आहेत. आता तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील हा निव्वळ स्वार्थीपणा आहे.
एकनाथ शिंदे अमित शाहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर
ओमराजे निंबाळकरांच्या वतीने कुणी पैसे घेतले, पहिला 15 कोटींचा अॅडव्हान्स कुठे आणि कसा घेतला गेला याची सगळी माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचली आहे, असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राला तोडण्यासारखं आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.




