
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानाचा संदर्भ देत, “मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर साप-विंचू सोडा”, अशा तीव्र शब्दांत सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.
गडचिरोलीतील घटनेने खळबळ
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेत रात्री झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. या घटनेत एकुण सहा मुलींना सर्पदंश झाला ज्यात तीन विद्यार्थीनींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) कडाडून टीका केली आहे.
आदिवासींचा कसला विकास करत आहात?
संजय राऊत म्हणाले, “वाघ, बिबटे, जंगली प्राणी आणि साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत. तुम्ही गडचिरोलीचा नक्षलवाद संपला असे म्हणत आहात, पण आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीत. ते अशा पद्धतीने मारले जात आहेत. तुम्ही आदिवासींचा कसला विकास करत आहात? त्यांना साप अथवा विंचू चावल्यावर उपचार मिळत नाहीत. तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने जर या राज्याचे सरकार हळहळले नसेल, अस्वस्थ झाले नसेल तर यासारखे निर्दयी सरकार नाही. या राज्यातील सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था जाऊन बघा, तुमच्या विकासामुळे त्यांना काय मिळत आहे?” असा थेट त्यांनी उपस्थित केला.
साप पकडा, मुंबईला या आणि मंत्र्यांच्या घरात सोडा
गडचिरोलीतील परिस्थितीची माहिती देताना त्यांनी सांगितले, “त्या मुलींची प्रकृती आता स्थिर आहे, मी आज सकाळीच माहिती घेतली. नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर अशा ठिकाणी आदिवासींच्या ज्या आश्रमशाळा आहेत, त्या अत्यंत भयंकर अवस्थेत आहेत. तिथे अशा प्रकारच्या विंचू आणि सर्पदंशाच्या घटना आठवड्यातून दोन ते तीन वेळा घडतात. अनेकांचे मृत्यू रेकॉर्डवर आलेले नाहीत. काल तीन मुलींच्या मृत्यूने मी इतका अस्वस्थ आहे की, महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? मी तर आदिवासींना सांगणार आहे की, गडचिरोलीत साप पकडा, मुंबईला या आणि मंत्र्यांच्या (Ministers) घरात सोडा. मग त्यांना कळेल मृत्यूचे भय काय असते ते,” असे देखील ते म्हणाले.
गडचिरोलीतील खाण उद्योगावर थेट निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यात जो खाण उद्योग आहे, तिथे हजारो-लाखो वाहने चालत आहेत. त्या वाहनांखाली गेल्या वर्षभरात 1500 आदिवासी चिरडून मेले आहेत. एफआयआर नको म्हणून त्यांचे मृतदेहसुद्धा गायब केले जातात. पाच मिनिटांत ती बॉडी हलवली जाते, पाणी मारून रक्त साफ केले जाते आणि पुरावे नष्ट केले जातात. हा साधारण एक-दीड वर्षाचा आकडा आहे आणि याची नोंद कुठेही ठेवली जात नाही. जवळपास 1500 लोक मारले गेले आहेत,” असा दावा त्यांनी यावेळी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री काय करत आहेत, आदिवासी विकास मंत्री काय करत आहेत? यासाठी तुम्हाला विकास हवा आहे का? तुम्ही आदिवासींना विस्थापित केले आहे. तिकडे कसला रोजगार आणताय, किती रोजगार मिळाला आहे? भारतीय जनता पक्षाचे देणगीदार जे तुम्हाला लाच देतात, त्यांना तुम्ही गडचिरोलीचे जंगल, डोंगर आणि नद्या उद्ध्वस्त करायला दिल्या आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
आश्रमशाळांचा निधी कोण खात आहे?
आश्रमशाळांच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना राऊत म्हणाले, “आश्रमशाळांना जो निधी दिला जातो तो कुठे जातो? तो निधी कोण खात आहे? हे कोणाचे लोक आहेत? भाजपचे देणगीदार लाच देतात, त्यांना डोंगर, नद्या उद्ध्वस्त करायला दिले आहे. आश्रमशाळांना निधी दिला जातो तो कुठे जातो? ते कोणाचे लोक आहेत? असा सवालही त्यांनी केला. तीन मुलींच्या सर्पदंशाची घटना समोर आली, पण आतापर्यंत असंख्य मुले आणि मुली विंचू व सर्पदंशाने आदिवासी पाड्यावर मरण पावले आहेत. तिथे रुग्णवाहिका नाही, झोळीमध्ये रुग्णांना न्यावे लागत आहे आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करत आहेत, नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करत आहेत. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात?, ” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“नक्षलवाद कोणासाठी संपवला? तर या उद्योगपतींसाठी संपवला, आदिवासींसाठी नाही. आदिवासींचा मृत्यू या मार्गाने सुरूच आहे. यातूनच एखादा नक्षलवादी परत निर्माण झाला तर त्याला गोळ्या घातल्या जातात,” अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली. दुर्गम भागात सर्पदंशाच्या अनेक घटना समोर आल्या. तिथे रुग्णवाहिका नसते. आई-वडिलांचे मृतदेह खांद्यांवर न्यावे लागत आहेत. आदिवासींमधून नक्षलवादी निर्माण होतात, त्यांना मग गोळ्या घातल्या जातात. मंत्री फक्त आदिवासींना नाचवत आहेत. गडचिरोली कलेक्टर, वनखाते, पालकमंत्र्यांना हप्ते जात आहेत. मुले मरत आहेत. आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.




