
नाशिक | प्रतिनिधी
शालार्थ आयडी घोटाळ्यातील (Shalartha ID Scam) संशयित आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड (Sanjay Garud) यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयातून अचानक जामीन अर्ज मागे घेतल्याने तपासाला (Bail Application Withdrawn) वेगळे वळण मिळाले आहे. कायदेशीर गणिते अचानक बदलल्याने आता गरुड यांचा जिल्हा रुग्णालयातील आराम संपून त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात होणार की पोलीस त्यांना पुन्हा ताब्यात घेणार, याकडे सर्वांचे लक्ष ला गले आहे.
२७ जुलै रोजी सोलापूरच्या फार्महाऊसमधून मध्यरात्री अटक झाल्यापासून संजय गरुड हे वैद्यकीय कारणांचे दाखले देत नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावलेली असतानाही, गेल्या महिनाभरापासून त्यांचा कारागृहाऐवजी थेट रुग्णालयातच मुक्काम असल्याने पोलिसांच्या आणि वैद्यकीय प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. न्यायालयातही गरुड यांच्या या व्हीआयपी उपचारांवर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी (दि. २७) न्यायालय आपला निकाल देणार होते. मात्र, ऐन सुनावणीच्या वेळी अर्ज मागे घेतल्याने गरुड यांच्या वकिलांनी कोणती नवीन रणनीती आखली आहे याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत. हा अर्ज फेटाळला गेल्यास उच्च न्यायालयात जाणे कठीण होईल, या भीतीपोटी ही माघार घेतली गेली का?, पोलिसांकडून रुग्णालयातील मुक्कामावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता ओळ खून ही चाल खेळली गेली? आदी बाबत चर्चा सुरु आहेत.
“संध्याकाळपर्यंत बघू काय करतात…”; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम, म्हणाले तळतळाट घेऊ नका…
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाचे प्रमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके या घोटाळ्याचा सखोल तपास करत आहेत. गरुड यांनी जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे आता पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता गरुड यांच्या प्रकृतीबाबत जिल्हा रुग्णालयाकडून विशेष मेडिकल बोर्डाचा अहवाल मागवून त्यांचा डिस्चार्ज निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. डिस्चार्ज मिळताच त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात केली जाऊ शकते.
इतरांच्या अडचणीत वाढ
याच गुन्ह्यात गेल्या आठ महिन्यांपासून कारागृहात असलेले माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या जामीन अर्जावरही तीन सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या गरुड यांनी जामीन अर्ज मागे घेतल्याने, त्याचा अप्रत्यक्ष फटका उपासनी यांच्या जामीन अर्जाला बसू शकतो. गरुड यांच्या या माघारीमुळे पोलीस तपासाचा रोख आक्रमक झाला असून, येत्या काही दिवसांत शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी काही बड्या हस्तींचे बुरखे फाटण्याची शक्यता आहे.




