नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शिवसेना ठाकरे गटाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या ९ पैकी ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी ४ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे दोन खासदारांनी अद्याप लोकसभा अध्यक्षांना पाठवायच्या पत्रावर सह्याच केल्या नसल्याचा दावाही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी फूट पडली आहे की नाही? आणि पडली असल्यास किती खासदार फुटले? याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना मोठा इशारा दिला आहे.
तातडीने कारवाई सुरु होणार
संजय राऊत व अरविंद सावंत यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीआधी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊतांनी बंडखोरांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिला. “आम्ही सगळ्यांना व्हीप दिला आहे. आम्ही वाट पाहणार आणि त्यानंतर तातडीने कारवाई सुरू होणार”, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे आता या खासदारांवर नेमकी काय कारवाई होणार? आणि कारवाई झाली तर ती खासदारांना लागू असेल का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
व्हीप काढला जातो तेव्हा गांभीर्य समजले पाहिजे
यावेळी संजय राऊत म्हणाले की, अरविंद सावंत यांनी यांची आजची खासदारांची बैठक व्हीप काढून बोलवली आहे. जेव्हा व्हीप काढला जातो, तेव्हा त्या बैठकीचे गांभीर्य समजले पाहिजे. हा पक्षाचा आदेश असतो आणि तो पाळावा लागतो. महत्त्वाच्या विषयांवर खासदारांशी चर्चा करणे आम्हाला आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारची बैठक बोलवून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. हा जो व्हीप आहे, तो प्रत्येकापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या घरी, मेलवर, व्हॉट्सअपवर गेलेला आहे. त्या अनेकांना प्रत्यक्ष फोनवरून सुद्धा आम्ही हा निरोप दिला आहे. आता कालपासून तुम्ही वाहिन्यांवर जे वातावरण दाखवत आहात, ते पाहिल्यावर मला तर असे वाटायला लागले आहे की, आमचे १५ खासदार पुन्हा येतील. पण आता ११ वाजता बैठक आहे. इथून आम्ही संसदेच्या कार्यालयातील बैठकीला जाऊ आणि बैठकीतील कामकाज पूर्ण करू, अशी माहिती दिली.
आता तोडून दाखवा, तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, संसदेतील आमच्या पक्षाच्या कार्यालयात ११ वाजता बैठक होणार आहे. तुम्ही ज्यांची नावं घेताय, त्यांना वाटतं एकदा त्यांनी तोडून दाखवलं आता सांगतो तोडून दाखवा,तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही. आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. लोकशाहीचा खेळ लावलाय का? याला फोडू त्याला फोडू, पैशांची मस्ती आलीय का? ईडी सीबीआयची धमकी कोणाला देताय, आम्ही जेलमध्ये जाऊन आलोय, पुन्हा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ, देशाची प्रतिष्ठा, नियम, संविधानासोबत तुम्ही खेळ करताय, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचे नाही
उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवारांचा फोन झाला, आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल. बाळासाहेबांची शिकवण तुडवा असल्याचं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा शेवट केला.
वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा, कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा, हा बाळसाहेबांचा विचार आहे त्याची आठवण करुन देतो, असे अरविंद सावंत म्हणाले.




