नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
फेब्रुवारी महिन्यापासून सुरु असलेलं अमेरिका-इराण यांच्यातील युद्धाला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी एक ऐतिहासिक शांतता करार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी युद्ध संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर औपचारिकपणे स्वाक्षरी केली आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सकाळी ६ वाजता करारावर सह्या केल्या.
अमेरिकी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फ्रान्समधील एका राजवाड्यात मॅक्रॉन यांच्यासोबतच्या भोजनादरम्यान अमेरिका-इराण कराराच्या छापील प्रतीवर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. स्वाक्षरी केलेल्या कराराच्या प्रती इराण आणि मध्यस्थ देशांना पाठवण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे मुख्य वाटाघाटीकार मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या करारानुसार इराणमधील युद्ध समाप्त होईल आणि लेबनॉनमधील संघर्षही संपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी समाप्त करण्याची चर्चा करण्यात आली आहे. इराणच्या अण्वस्त्रांवर ६० दिवस चर्चा होणार आहे.
जगावरील मोठे आर्थिक संकट टळले
फ्रान्समध्ये पार पडलेल्या ‘जी-७’ (G7) परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची माहिती दिली. ते म्हणाले, “या अंतरिम करारामुळे जगावरील मोठे आर्थिक संकट टळले आहे. गेल्या तीन दिवसांत ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तील सागरी वाहतूक कमालीची वाढली असून, मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.”
संपादकीय : १८ जून २०२६ – तहानलेले जलस्रोत अन् नियोजनाची कसरत
तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा भीषण बॉम्बहल्ला करु
यावेळी इराणला इशारा देताना ट्रम्प त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत म्हणाले, “इराणी लोक हुशार आहेत, त्यांनी या कराराचा आदर करावा अशी माझी इच्छा आहे. पण जर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा भीषण बॉम्बहल्ला करू.”
दोन्ही देशांचे वाटाघाटी करणारे नेते जिनिव्हा येथे एकत्र येणार आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडमधील बैठकीचा उद्देश करारावर स्वाक्षरी करणे नाही. ही बैठक प्रत्यक्षात होणार की नाही यावर पुढील काही तासांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई म्हणाले की, इराणला वाहतूक किंवा विम्यावर कोणत्याही निर्बंधांशिवाय तेल विकण्याची परवानगी दिली पाहिजे. त्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा पूर्ण हक्क असला पाहिजे.
करारात नेमकं काय आहे?
या करारानुसार, अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आपली नौदल नाकेबंदी आणि संबंधित निर्बंध उठवण्यास सुरुवात करेल, तर इराण सुरुवातीच्या 60 दिवसांच्या कालावधीसाठी या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची सुरक्षित आणि मुक्त ये-जा सुलभ करेल. या दस्तऐवजात टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवणे, इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे, इराणच्या तेलाच्या निर्यातीसाठी ‘ट्रेझरी वेव्हर्स’ (आर्थिक निर्बंधांतून विशेष सवलती) देणे आणि इराणसाठी किमान 300 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा पुनर्बांधणी व आर्थिक विकास कार्यक्रम राबवणे या योजनांची रूपरेषाही मांडण्यात आली आहे. इराणने या सामंजस्य करारात पुष्टी केली आहे की ते अणुशस्त्रांची निर्मिती किंवा संपादन करणार नाहीत. तसेच, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली इराणकडील समृद्ध युरेनियमच्या साठ्याच्या भविष्याबाबत चर्चा करण्याच्या तरतुदींचाही या करारात समावेश आहे.
स्वाक्षरीनंतर दोन्ही देशांना अंतिम वाटाघाटींसाठी ६० दिवसांचा वेळ मिळणार आहे. या काळात इराणचा अणू कार्यक्रम, शिल्लक असलेले आर्थिक निर्बंध आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम करार केला जाईल. ‘जी-७’ देशांच्या प्रमुखांनीही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहने जागतिक व्यापारासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.




