Thursday, May 21, 2026
HomeनाशिकSushama Andhare: रुपाली चाकणकर, केसरकरांसोबत खरातचे फोटो…; "ये रिश्ता क्या कहलाता है"...

Sushama Andhare: रुपाली चाकणकर, केसरकरांसोबत खरातचे फोटो…; “ये रिश्ता क्या कहलाता है” म्हणत सुषमा अंधारेंचा खोचक सवाल

नाशिक | Nashik
भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्याबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चाकणकर आपलाच हेतू साध्य करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी आज नाशिकमध्ये येत पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी अनेक मोठे खुलासे करत पुरावे देखील सादर केलेत. एवढेच नाही तर, संगीतकार अन्नू मलिक यांच्यावर #MeeToo मोहिमेअंतर्गत चित्रपट सृष्टीतील दोन महिलांनी गंभीर आरोप केलेले, ज्यावर रुपाली चाकणकर यांनी कोणती भूमिका घेतली आणि का घतली. याबद्दल देखील सुषमा अंधारे यांनी मोठा खुलासा केला आहे.

- Advertisement -

त्या पोलिसांच्या रेकॉर्डवर का येत नाही?
रुपाली चाकणकर यांचे नाव वारंवार या प्रकरणात येत असतानाही अजून त्या पोलिसांच्या रेकॉर्डवर का येत नाही, असा सवाल अंधारे यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मित्र पक्षातील नेत्यांना चेकमेट करायचे आहे यासाठी प्रकरण उभे करु नये, तर अशोक खरात प्रकरणाची पाळेमुळे खणून काढावी, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

ये रिश्ता क्या कहलाता है? अंधारेंचा खोचक सवाल
सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकर, अशोक खरात आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीचे आणि बैठकांचे फोटो दाखवले. सुषमा अंधारे यांनी भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचे अशोक खरातसोबतचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांनी असा सवाल केला की, “हा भस्मासूर (अशोक खरात) कोणी पोसला? त्याला पैसा-अडका कोणी दिला?”. हेमंत गोडसे यांच्या एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अशोक खरात पुजारी म्हणून उपस्थित असल्याचे फोटो त्यांनी दाखवले. फोटो दाखवत ये रिश्ता क्या कहलाता है, असा खोचक सवाल सत्तेतील दोन्ही पक्षांना केला.

चाकणकर तटकरे यांच्यात संबंध काय?
सुषमा अंधारे यांनी दावा केला की, रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणात एका कंपनीत भागीदारी आहे. हा प्रकल्प तब्बल ४५० ते ५०० कोटी रुपयांचा असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. हे चौधरी नाव महत्त्वाचे आहे कारण ते तटकरे (अदिती तटकरे किंवा सुनील तटकरे यांच्या संदर्भात) यांच्यासोबत अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहेत. यावरून अंधारे यांनी ‘A=B=C=’ असे समीकरण मांडले आहे. म्हणजे जर चौधरी हे तटकरेंचे भागीदार आहेत आणि तेच चौधरी चाकणकरांचेही भागीदार आहेत, तर मग चाकणकर आणि तटकरे यांच्यात काय संबंध आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis: लॉकडाऊन लागणार नाही! अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार; CM फडणवीसांचा गंभीर इशारा

शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसी स्टाफशी काय संबंध?
अंधारे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे सिन्नर एमआयडीसीशी संबंधित एका कार्यक्रमातील फोटो दाखवले. शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध? आणि तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या? असा सवाल त्यांनी अंधारे यांनी उपस्थित केला. त्या बॅनरवर ‘सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित’ असे लिहिले असून, तिथे कॅबिनेट मंत्री शांत उभे आहेत आणि रुपाली चाकणकर यांचा सत्कार खरातच्या उपस्थितीत होत आहे, यावरही सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतला. रुपाली चाकणकर यांनी “मी खरातला केवळ सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते” असे स्पष्टीकरण दिले होते. यावर अंधारे यांनी प्रश्न विचारला की, जर सामाजिक उपक्रम होते तर तिथे एमआयडीसीचा पूर्ण स्टाफ का होता? अशा सवाल देखील अंधारेंनी उपस्थित केला आहे. खरात आणि चाकणकर यांच्यातील संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाणी देणं हा माणुसकीचा विषय
सुषमा अंधारे म्हणाल्या की, मागील दोन दिवसांपासून साप समजून भुई धोपटण्याचे काम सुरु आहे. २०२० साली मिरगाव ग्रामसभेने गावाला पाणी मिळावे यासाठी ठराव केला. प्रति दिन, प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतने पाणी देण्याचा निर्णय झाला होता. मिरगावच्या ग्रामस्थांनी पाणी मागितले. याची शिफारस तत्कालिन एकिकृत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी केली. तत्कालिन जलसंपदा मंत्री यांच्या अखत्यारीत हा विषय होता. एकिकृत राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे त्या खात्याचे मंत्री होते. त्यांच्या खात्याच्या उपसमितीने पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाणी देणं हा माणुसकीचा विषय आहे.

पिस्तुलाच्या परवान्याचे नुतनीकरण कोणाच्या काळात झाले?
अशोक खरातला पिस्तूलीचा परवाना कोणाच्या कार्यकाळात देण्यात आला. २०२४ मध्ये पिस्तुलाचा परवान्याचे नुतनीकरण कोणाच्या काळात झाले, असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अशोक खरातला २०१२ मध्ये बंदुकीचा परवाना मिळाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २०२४ मध्ये या बंदुकीच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. जर दीड वर्षांपासून खरातची कृत्ये माहिती होती, तर फडणवीस सरकारने २०२४ मध्ये त्याच्या बंदुकीच्या परवान्याचे नूतनीकरण का केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मंदिराला दीड कोटींचा निधी देणारे मंत्री कोण
अशोक खरातच्या मंदिराला दीड कोटींचा निधी देणारे मंत्री कोणाच्या अंगाखांद्यावर खेळतात असा सवाल करत सुषमा अंधारे म्हणाल्या की, जयकुमार रावल यांनी दीड कोटी रुपयांचा निधी दिला होता. तो कोणाच्या आशीर्वादाने दिला. देवेंद्र फडणवीस हे आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. ते दावा करत आहेत की, माझ्याकडे सर्वाधिक माहिती आहे, असे सांगत अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक माहिती असलीच पाहिजे, कारण त्यांच्याकडे दहा वर्षांपासून गृहखाते आहे. मात्र दहा वर्ष गृहखाते असतानाही त्यांना अशोक खरातला कोण पोसत होतं, हे माहित नाही का?

त्यामुळे या दोघांची चौकशी झाली पाहिजे
फक्त फोटोंवरुन आरोप करत नाही. कारण अमित शाह यांचेही फोटो खरात सोबत आहेत. मात्र एखाद्या व्यक्तीचे वारंवार फोटो सापडतात, तिथे शंका येते. केसरकर आणि चाकणकर यांचे असेच वारंवार फोटो येत आहेत. त्यामुळे या दोघांची चौकशी झाली पाहिजे. यांचे सीडीआर तपासले गेले पाहिजे. यांच्या संपत्तीचे स्त्रोत तपासले गेले पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली.

सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT (विशेष तपास पथक) कडे दीपक केसरकर यांची चौकशी व्हावी, असे अधिकृत पत्र दिले आहे. “माझ्या नेत्यावर (उद्धव ठाकरे) ताज हॉटेलमध्ये बसल्याचे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आता या फोटोंचे उत्तर द्यावे,” असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालाट करण्यात आली आहे. बुधवारी (20 मे) बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी संगमनेरच्या संचालिका सरस्वती...