मुंबई | Mumbai
शिवसेना शिंदे गटाने खासदार फोडल्याची उद्धव ठाकरे यांना कुणकुण लागताच शिवसेना ठाकरे गोटात हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आणि सहा खासदार सध्या दिल्लीत असून बुधवारी सकाळी ते लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना आपल्या स्वतंत्र गटाचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा असल्याचे पत्र सादर करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांच्याकडून बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली आहे.
ठाकरे गटाने खासदारांनी फुटून स्वतंत्र गट स्थापन केल्यास काय करायचे, यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला आहे. त्यानुसार ठाकरे गट या फुटीर खासदारांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. व्हीप पाठवल्यानंतर खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संदर्भातील पत्र शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संपादकीय : शांततेचे ढग, की ट्रम्प यांची खेळी?
पत्रात नेमकं काय म्हंटले आहे?
“शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व लोकसभा सदस्यांना सूचित करण्यात येते की, पक्षाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदीय दलाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. गुरुवारी, १८ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संसद भवनातील (संविधान सदन) संसदीय दल कार्यालय १२८-A येथे सर्व खासदारांनी अनिवार्यपणे (सक्तीने) उपस्थित राहावे.”
दिल्लीत शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये गुप्त बैठका सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर हा व्हीप जारी करून ठाकरे गटाने बंडखोर खासदारांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हीप कायदेशीररित्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या बैठकीला जो खासदार गैरहजर राहील, त्याच्यावर पक्षादेश डावलल्याप्रकरणी अपात्रतेची थेट कारवाई करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदेंच्या वाटेवर असणाऱ्या खासदारांची नावे
- संजय जाधव
- संजय देशमुख
- नागेश पाटील आष्टीकर
- ओमराजे निंबाळकर
- भाऊसाहेब वाकचौरे
- संजय दिना पाटील




