मुंबई | Mumbai
एकीकडे देशात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल 15 टक्के पावसाची तूट (Rainfall Deficit) नोंदवली गेली असतानाच, आता हवामान विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला (Monsoon Withdrawal) सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. १ जून ते २० सप्टेंबर या कालावधीत देशात ६९९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, सामान्य पर्जन्यमान ८२२ मिमी आहे. 21 सप्टेंबरपासून नैऋत्य मोसमी वारे (Southwest Monsoon Winds) राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून माघारी फिरले आहेत.
मात्र, महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील काही भागांत पावसाचे वातावरण पुन्हा सक्रिय झाले आहे. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, २३ सप्टेंबरपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानच्या बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत सौराष्ट्र-कच्छ, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातूनही मान्सून काढता पाय घेईल. मात्र, यंदा मोसमी पावसाने अनेक भागांत दांडी मारल्याने देशात 15 टक्के तुट नोंदवली गेली आहे.
बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली
बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून २१ सप्टेंबरपर्यंत अवदाब आणि २२ सप्टेंबरपर्यंत तीव्र अवदाबात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली २३ सप्टेंबरच्या सुमारास दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याचा अंदाज आहे. या प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रातील हवामानावरही जाणवत असून राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाची सक्रियता वाढली आहे.
महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
२१ सप्टेंबर
विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुण्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२२ सप्टेंबर
२२ सप्टेंबर रोजी राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांसह नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.
२३ सप्टेंबर
२३ सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो. राज्यातील उर्वरित भागांत हवामान मुख्यतः ढगाळ किंवा कोरडे राहण्याचा अंदाज आहे.




