सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
शहर व उपनगरांत सोनसाखळी चोरांची दहशत निर्माण झाली आहे. बायपासवरील सरदवाडी पुलाजवळ मुख्याध्यापिका सीमा हांडगे यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची पोत चोरट्यांनी ओरबाडून पोबारा केला. त्यामुळे फिरण्यास जाणार्या महिलांत दहशत निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका किती?
हांडगे यांचे पती भागवत नामदेव आरोटे हे बायपासवर हांडगे यांना घेण्यासाठी थांबले होते. त्यांच्याकडून दुचाकीची चावी गहाळ झाल्याने त्याचा ते शोध घेत होते. चावी सापडत नसल्याने त्यांनी मुलगी सायली व जावई अमोल सूर्यभान नाईकवाडे यांना बोलावून घेतले. काही वेळाने सीमा हांडगे तिथे पोहोचल्या. सर्वजण चावीचा शोध घेत असताना दुचाकीवरून दोन अज्ञात आले. त्यांनी सीमा हांडगे यांच्याजवळ दुचाकी हळू केली. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हांडगे यांच्या गळ्यातील वाट्या व पट्टा असलेली चार तोळ्याची पोत ओरबाडली व लगोलग वेगाने दुचाकी दामटून पोबारा केला. हांडगे यांनी आरडाओरड केली. यावेळी पती भागवत आरोटे, मुलगी व जावई मदतीला धावून आले. मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार दिसेनासे झाले होते. पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.
हे देखील वाचा – Political News : महायुतीच अखेर ठरल! राज्यात ५ डिसेंबरला स्थापन होणार नवं सरकार
सहा महिन्यांपूर्वी शहर व उपनगरांत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. सरदवाडी मार्ग, विजयनगर, बारागावपिंप्री रोड, बसस्थानक, संगमनेर नाका, वावी वेस, नाशिक वेस, गंगावेस या भागातून सोनसाखळी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातच भल्या सकाळी फिरण्यास जाणार्या महिलांनाही सोनसाखळी चोरट्यांनी टार्गेट केले होते. घटनांत वाढ झाल्याने पोलिसांनी सोशल मीडियावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते.
बाहेर जाताना सोन्याचे दागिने वापरू नये, अंगावरील दागिने कपड्याने झाकावेत यासह विविध उपाययोजना सुचवल्या होत्या. तर पहाटे पाच वाजेपासून रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. ठिकठिकाणी नाकेबंदी करून दुचाकीस्वारांवर लक्ष ठेवण्यात येत होते. त्यानंतर सोनसाखळी चोरीच्या घटनांना पायबंद बसला होता. सहा महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा आता अशा घटना घडू लागल्याने परिसरातील नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा