मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत तातडीच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतची अधिसूचना काढण्यात येईल, तसेच केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. मात्र, या आश्वासनांवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजचा संदर्भ देत प्रत्यक्ष किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला आणि सध्याच्या दुष्काळासाठी सरकारने नेमकी कोणती तयारी केली, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली.
“मागच्या पॅकेजचं काय झालं?”
उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या सुमारे 31 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा मुद्दा उपस्थित केला. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचा संदर्भ देत, त्यातील प्रत्यक्ष मदत किती शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली, याची माहिती महाराष्ट्राला मिळायला हवी, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, याच मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही 31,628 कोटी रुपयांच्या मागील पॅकेजचा हिशेब सरकारकडे मागितला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, त्या पॅकेजमधील संपूर्ण रक्कम खर्च झालेली नाही. हा आकडा आणि खर्चाबाबतचा दावा वडेट्टीवार यांचा आहे; त्यावर सरकारची अधिकृत बाजूही महत्त्वाची ठरते.
“कशाची वाट पाहताय?”
दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना पंचनाम्यांसाठी प्रतीक्षा का केली जात आहे, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली असून खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सरकारने आधीपासून दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना केल्या
हवामान खाते व आंतरराष्ट्रीय संस्थांनी मोसमाच्या सुरुवातीलाच दुष्काळाचा अंदाज वर्तवला होता. ही शक्यता लक्षात घेऊन सरकारने आधीपासून दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना केल्या, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. दुष्काळीच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशनाची मागणी ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार किंवा तिबार पेरणी करावी लागत आहे. परिस्थिती भयानक असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, धरणे-विहिरी भरणे आणि आगामी रब्बी हंगामासाठी समाधानकारक पाऊस व्हावा, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी केली.
जशी मी कर्जमुक्ती केली होती, आजसुद्धा जिथे जिथे जाल तिथे सगळे शेतकरी सांगतात की 15 दिवसात त्यांना कोणताही निकष वगैरे न तपासता, म्हणजे सरसकट सगळ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली होती. गेल्यावर्षी जाहीर केलेलं पॅकेज किती शेतकऱ्यांना मिळालं, आता तुम्ही जाहीर केलेली कर्जमाफीची योजना, त्यानुसार किती शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे, याची यादी आम्हाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळी दौरे नुसते काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का?
आम्ही दोन-तीन दिवसात याबाबत काहीतरी घोषणा करू म्हणता, मग तुम्ही कॅबिनेट मिटिंग घेताय कशाला? कॅबिनेट मिटिंगमध्ये होतंय काय? हे दुष्काळी दौरे नुसते काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का? दुष्काळी दौरे तुम्ही जे काय करता आहात, त्याच्यामध्ये खरोखर तुमच्यासोबत जे काही अधिकारी आहेत, तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, तुमचे सहकारी मंत्री आहेत, त्यांना शेतकऱ्याच्या दुःखाशी देणं-घेणं आहे की नाही, हे आम्हाला काही कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
डबल इंजिन सरकार काहीच कामाचे नाही, इंजिन सरकार फक्त वाफ आणि धूर सोडतंय
मुख्यमंत्र्यांनी १० मिनिटांत काही ठिकाणी दौरे उरकलेत, दौऱ्याचे देखावे का करताहेत? ५ ऑक्टोबरपासून पंचनामे करतो म्हणाले, तुम्हाला ५ ऑक्टोबरपर्यंत वाट का पाहायची आहे? पंचाग न पाहता शेतकऱ्यांना मदत करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. डबल इंजिन सरकार काहीच कामाचे नाही. इंजिन सरकार फक्त वाफ आणि धूर सोडतंय, अशी टीका त्यांनी केली.
तुमचे डोळे तुमचे निकष असले पाहिजेत
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, काही काही ठिकाणचे दौरे हे 10-10 मिनिटात आटोपले, मग हे सगळे तुम्ही देखावे का करता? कशासाठी करता? म्हणजे कोणाला फसवताय? सरकार जर काही ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’च्या मदतीवरती अवलंबून नसेल, तर का घोषित करत नाही दुष्काळ? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, आता निकष काय, तिकडे सगळं सुकलेलं दिसतंय. तुमचे डोळे तुमचे निकष असले पाहिजेत. समोर दिसतंय की शेतकरी आज पूर्णपणे संपलेला आहे, त्याचं पीक जळून खाक झालेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये तुम्ही कोणते निकष बघताय, कोणाची वाट बघताय? खरोखर किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे? माफी हा त्यांचा शब्द आहे, मुक्ती हा माझा शब्द आहे, ही रक्कम खरोखरच शेतकऱ्यांच्या हातात मिळालीय का?”




