छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अंबादास दानवे यांना मध्यरात्रीच्या सुमारास सातत्याने धमक्यांचे फोन येत आहेत. अंबादास दानवे यांनी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रार करताना ज्या क्रमांकावरून फोन आला, तो नंबरही दिलाय.
नेमकी घटना काय?
अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे सांगितले. ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च,१४ मार्च असे चार दिवस दानवे यांना लागोपाठ फोन आले. कापून टाकू, ठोकून टाकू असे म्हणत धमकी दिली. दानवे यांना ९५९५९५९३०३ या मोबाईल क्रमांकाहून फोन येत असल्याचे तक्रारीवरून समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून कसून तपास सुरू केला आहे. धमक्या का दिल्या? कुणी दिल्या? यामागे कुणाचा हात आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यत येत आहे.
संपादकीय : १६ मार्च २०२६ – आधी दिल्ली, आता लडाख!
विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या महिन्यातच अंबादास दानवे यांची सरकारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या संरक्षणाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती दानवे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
यावेळी अंबादास दानवे यांनी नेमके काय घडले, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मागच्या ३ ते ४ दिवसांपासून मला सतत फोन येत आहे. मला अशा फोनची सवय आहे. अनेक जण मला जाब विचारायला फोन करतात. तुम्ही असे का केले, तसे का केले, असे मला विचारत असतात. पण ते तेवढ्यापुरते असते. आम्ही त्यांच्या फार काही नादी लागत नाही. हे रोजचचे आहे. पण गेल्या आठवड्यात दर दोन तीन दिवस रात्री ११, १२, १, २, २.३० वाजता मला धमकीचे फोन येत होते. एकाच फोनवरुन वारंवार फोन येत होते. मी तीन दिवस त्याची काही दखल घेतली नाही.
पण चौथ्या दिवशी मला असे वाटले की आपण याबद्दल तक्रार करुन ठेवावी. एक खबरदारी म्हणून पोलिसात तक्रार केली. मी धमक्यांना घाबरत नाही. पोलिसांना नंबरसहित या तक्रारीची माहिती दिली आहे. ते मला जीवे मारण्याची धमकी असे बोलले आहेत. पण मला याची सवय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित फोन नंबर कोणाचा आहे, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
दरम्यान, अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन आल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आक्रमक झाले होते. त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली थेट भूमिका मांडली होती. त्यामुळेच त्यांना धमकी आली का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.





