मुंबई | Mumbai
महायुती सरकारचा (Mahayuti Govertment) विधानसभा निवडणूक निकालाच्या (Result) १३ दिवसांनंतर मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता ‘महा’शपथविधी पार पडणार आहे. तब्बल ४० हजार जणांची आसनव्यवस्था आझाद मैदानात करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.मात्र, या शपथविधीच्या आधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना शुभेच्छा देत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे आज १०० टक्के उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यात अजिबात नाही. कारण अडीच तीन वर्षांपूर्वी त्यांच्यात हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पक्ष सोडला.आज तीन लोकांनी शपथ घेतल्यावर उरलेल्या मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी बराच वेळ मिळतो. जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील.अनेकांच्या नाराज्या ओढवून घ्याव्या लागतात, मंत्रिमंडळ विस्तारात काय होते बघूयात. आता महाराष्ट्राच्या नशिबात काय लिहिलं आहे ते पाहूयात, असे म्हणत राऊतांनी शिंदेना टोला लगावला.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : अखेर फडणवीसांच्या प्रयत्नांना यश; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
पुढे ते फडणवीस यांच्यावर टीका करतांना म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेत आहेत यावर प्रतिक्रिया द्यावं असं काही नाही. राज्याचा निकाल धक्कादायक आला त्यातून अजून राज्यातील जनता सावरलेली नाही. बहुमत असतानाही १३ दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाही. अखेर आज आझाद मैदानावर फडणवीस शपथ घेत आहेत. राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल. मागच्या अडीच वर्षांत राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले”, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.
तसेच अजित पवारांबाबत (Ajit Pawar) बोलतांना राऊत म्हणाले की, सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याने मी अजित पवार यांचे अभिनंदन करतो.एक प्रकारे उपमुख्यमंत्रिपदाचे आरक्षण त्यांच्यासाठी ठेवले आहे असे म्हणता येईल. त्यासाठी अनेकांचे योगदान आहे. उत्तम सहकार्य म्हणून अजित पवार यांनी काम केलं. उध्दव ठाकरे देखील अजित पवार यांचे नेहमी कौतुक करतात.अजित पवारांचे राजकारण वेगळे आहे. त्यांनी दिल्लीसोबत चांगलं जुळवून घेतले आहे अशी माझी पक्की माहिती आहे. पवारांवर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, त्या काय आहेत हे मला माहित आहे. महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचे नवीन पर्व सुरू होईल, त्यानंतर राज्यात पाच वर्षे धुमशान पाहायला मिळणार आहे त्याची तयारी ठेवा. यात महाराष्ट्राचे हित किती आणि अहित किती हे येणार काळ दाखवेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.